आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Having Illegal Weapons Issue At Nagar, Divya Marathi

जिल्ह्यात पुन्हा गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- व्यापारी जितेंद्र भाटिया हत्याप्रकरणात मुख्य आरोपी प्रदीप कोकाटे याने गावठी पिस्तुलाचा वापर केला. त्याला पिस्तूल पुरवणार्‍या आरोपीसह चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत. गावठी पिस्तुलांचा वापर प्रामुख्याने खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी असे गुन्हे करणारे करतात. या प्रकरणांच्या मुळापर्यंत जाण्यात पोलिस अपयशी ठरल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट वाढला आहे.
पिस्तुलांचा अवैध वापर राजरोसपणे सुरू आहे. चित्रपटातील दृश्यांप्रमाणे गोळीबार करून दहशत माजवण्याचे प्रकार वाढले आहेत. नेवासे तालुक्यातील वाळू व्यावसायिक, खंडणीबहाद्दर राजरोसपणे गावठी पिस्तुलाचा वापर करत आहेत. काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गावठी पिस्तूल वापरणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्यात आली होती. या कारवाईत जिल्ह्यात तब्बल 35 पिस्तुले जप्त करण्यात आली होती. मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणून नगर जिल्ह्यात विकणारी यंत्रणाच कार्यरत असल्याचे तेव्हा समोर आले होते. परंतु या अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या नंतर इतरत्र बदल्या झाल्यामुळे पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊ शकले नाहीत.
नंतरही गावठी पिस्तुले वापरणारे गजाआड होतच राहिले. स्थानिक गुन्हे शाखेतील बहुतांश आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवले, तर काही अजून फरार आहेत. त्यावरून गावठी पिस्तुले वापरणार्‍यांना मोकळीक मिळाली, हेच दिसून येते. आता तर गावठी पिस्तुलांची कीड एवढी फोफावली आहे की, पोलिस अजूनही तिच्या मुळापर्यंत जाऊ शकलेले नाहीत. वाळूतस्करी, गुंडगिरी, राजकारणातील गुंडगिरी आणि चोर्‍यामार्‍यांसाठी गावठी पिस्तुले वापरली जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांकडे गावठी पिस्तुले हमखास असतात. गावठी पिस्तुले सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचा वापरही वाढला आहे.
कडक मोहीम राबवणार

रिव्हॉल्व्हर, बंदूक, पिस्तूल जवळ असणे म्हणजे प्रतिष्ठेची बाब मानले जाते. संरक्षणापेक्षा प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राजकीय व्यक्तींसह विविध पेशांतील लोक शस्त्र परवाने घेतात. त्यासाठी अर्ज करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे जिल्ह्यात गावठी पिस्तुलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता गावठी पिस्तुलांकडे मोर्चा वळवणार आहे. लवकरच पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करणार आहोत.’’ अशोक ढेकणे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
आतापर्यंत जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा

2010 मध्ये - 33 गावठी पिस्तुले, 85 जिवंत काडतुसे, अटक आरोपी - 48, फरार आरोपी - 8, अटकपूर्व जामीन घेतलेले आरोपी - 15, एकूण 19 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त. सन 2014 आजपर्यंत - एकूण 27 गावठी पिस्तुले व 43 जिवंत काडतुसे जप्त. 2010 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस मध्यप्रदेशमध्ये तपासाकरिता गेले होते. परंतु मुख्य सूत्रधार त्यांना मिळाले नाहीत. अलीकडे गावठी पिस्तुलांचा राजरोसपणे होत असलेला वापर पाहता पोलिसांनी जप्त केलेला हा शस्त्रसाठा म्हणजे ‘हिमनगाचे टोक’ असल्याचे म्हटले जात आहे.