आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Got 37 Percent In Tenth Class, But Now Become IT Engineer

दहावीत ३७ टक्के मिळूनही गौरव बनला आयटी इंजिनिअर, मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहावीच्या परीक्षेत अवघे ३७ टक्के गुण मिळवणारा भिंगार येथील गौरव पाटोळे हा युवक अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.
गौरवचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नगरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. दहावीला अवघे ३७ टक्के गुण मिळाल्याने घरातील सदस्य मित्रमंडळी 'तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस', असे टोमणे मारत होती. मात्र, वडील म्हणत तू प्रयत्न करत रहा. वडिलांच्या पाठिंब्याने गौरवने मागे वळून पाहता पुढील प्रवास सुरू केला.

बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स गौरवने अहमदनगर कॉलेजमधून केले. पुणे येथील गरवारे कॉलेजमधून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. पहिली नोकरी त्याने पुणे येथे आयटी क्षेत्रात एक हजार रुपये महिन्यापासून सुरू केली. त्यानंतर पुण्यातच झेन्ससॉर या कंपनीत तो रुजू झाला. तीन वर्षे काम केल्यानंतर बंगळुरू येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीची त्याला ऑफर आली. बंगळुरूमध्ये काम केल्यानंतर त्याचे काम इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून कंपनीने त्याला अमेरिकेत बोलावून घेतले. अमेरिकेत दाखल होण्याआधी तेथील कंपनीच्या अधिकाऱ्याने त्याची फोनवरून मुलाखत घेतली. ती तब्बल तासभर चालली. त्यानंतर भारतातील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी फोनवरून चार दिवस सातत्याने कंपनी कामाबाबत चर्चा केली. पाचव्या दिवशी त्याची अमेरिकेत इंजिनिअर म्हणून निवड झाल्याचा फोन आला.

गेल्या तीन वर्षांपासून गौरव अमेरिकेतील टेक्सास-डॅलेस येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करत आहे. नुकताच तो नगरमध्ये आला. "दिव्य मराठी'ने त्याच्याशी संवाद साधला असता भारतातील शिक्षण व्यवस्था, अमेरिकेतील विवाह संस्था, तेथील शिक्षण व्यवस्था, भारतातील युवक याविषयी तो भरभरून बोलला. गौरव म्हणाला, भारतात पालकांचा मुलांवर करिअरबाबत दबाव असतो.तसे अमेरिकेत होत नाही. अमेरिकेत मुलांना करिअरबाबत स्वातंत्र्य असल्याने ते मनासारखे करिअर करतात. भारतातील पालकांनीही मुलांमधील गुण आेळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

भारतातील शिक्षण व्यवस्था जगात सर्वात उत्कृष्ट आहे. अमेरिकेत येणारे ३० टक्के टॅलेंट हे भारतातूनच येते. भारतीय विवाह संस्था सर्वात चांगली आहे. अमेरिकेत घटस्फोटांचे प्रमाण ९० टक्के आहे, तर भारतात हे प्रमाण अवघे टक्का आहे. आता भारतीय संस्कृतीचे अनुकरण अमेरिकन लोकही करू लागले आहेत, ही अभिमानाची बाब आहे,असे गौरवने सांगितले.

सकारात्मकतेची प्रेरणा मुलांकडून घेतली
गौरवलहानपणी खोडकर होता. त्याच्याकडे कष्टाळूपणाबरोबरच खरे बोलण्याची नैतिकता आहे. त्याच्याशी मी मित्रत्वाचे संबंध ठेवले. माझा रागीट स्वभाव खरेतर माझ्या मुलांमुळेच गळून पडला. मुलाकडे पाहून माझा नकारात्मक स्वभाव सकारात्मकतेत बदलला. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आज मनापासून आनंद वाटतो.' जोसेफपाटोळे, गौरवचेवडील.

पुढे वाचा... अपयश आले, तरी पुढे जाण्याची तयारी ठेवा