आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शालेय पोषण आहार योजनेवर मुख्याध्यापक संघाचा बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शालेय पोषण आहार योजनेतील अन्न शिजवणे व इतर जबाबदार्‍यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्य कार्यकारिणी सभेत मंगळवारी (6 ऑगस्ट) घेण्यात आला. 15 ऑगस्टपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यास सरकारला सांगण्यात आले आहे.

महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने यांच्या अध्यक्षतेखाली एफर्टस् अँकॅडमीमध्ये आयोजित कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शालेय पोषण आहार दिला जातो. मूळ शासननिर्णयात या योजनेचे अन्न शिजवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांवर असल्याचा कोणताही उल्लेख नाही. तथापि, मुख्याध्यापक व शिक्षक ही जबाबदारी पार पाडत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीत दोष आढळल्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई झाल्याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत मुख्याध्यापिकेला जबाबदार धरून कारवाई झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने माध्यान्ह भोजन योजनेची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांवर टाकता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बालकांचा शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार शिक्षकांवर अशैक्षणिक कामे सोपवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने काही पर्याय सरकारला सुचवले आहेत. यात मध्यवर्ती स्वयंपाकगृह तयार करणे, स्वतंत्र यंत्रणेकडे त्याची जबाबदारी सोपवणे, बंद पाकीट किंवा अन्य योजनेमार्फत भोजन पुरवणे, पूर्वीप्रमाणे कोरडा तांदूळ देणे किंवा लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँकखात्यावर रोख रक्कम जमा करणे यांचा त्यात समावेश आहे. या मागण्यांवर 15 ऑगस्टपर्यंत तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा या योजनेवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा इशारा महामंडळातर्फे देण्यात आला आहे.

या सभेला सचिव अरुण थोरात, सुनील पंडित, जे. के. पाटील, प्रकाश पाटील, मस्तूद संदीपान, बी. एन. पवार, आर. डी. पवार, शिवाजी किलकिले, के. एम. थोरात, लता डांगे, बाळासाहेब वाकचौरे, ज्ञानदेव बेरड, सुरेश माळी, अमृत पांढरे, गजानन पाटील, अशोक पाटोळे, चंद्रकांत पंडित, आर. व्ही. पाटील, के. बी. पवार, प्रशांत रेड्डी आदी उपस्थित होते.