आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यसेविका शकिला शेख यांना ‘नाईटिंगेल’ पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नेवासे तालुक्यातील भेंडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका शकिला शेख यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार रविवारी (12 मे) नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला.


आरोग्य सेविका क्षेत्रात प्रथमच महाराष्ट्राला चार पुरस्कार मिळाले आहेत. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणार्‍या परिचारिकांचा गौरव केला जातो. दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भेंडा येथील शेख यांच्यासह शोभा योहाना, वंदना उईके, द्रौपदी साळवे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


अवघ्या साडेआठ हजार लोकवस्तीच्या भेंडा गावातील उपकेंद्रात उद्दिष्टाच्या पाचपट काम करीत दरवर्षी 200 ते 250 बाळंतपणे केली जातात. विशेष म्हणजे दहा वर्षांत या उपकेंद्रात एकही अर्भक अथवा मातेचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे शेख यांनी विश्वासार्हता निर्माण केली. काही वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली होती, मात्र ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांना पुन्हा भेंडा गावात नियुक्ती देण्यात आली.


‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम 21 जानेवारीला शेख यांच्या कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कारभारी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, अविनाश आहेर यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी शेख यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला. फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी शेख यांचे अभिनंदन केले.


ही तर कामाची पावती
मी मुख्यालयी राहात असल्याने कोणत्याही वेळी रुग्ण आल्यास सेवा देते. हा पुरस्कार म्हणजे आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आहे, असे मी समजते. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला.’’ शकिला शेख, आरोग्य सेविका.


इतरांनीही अनुकरण करावे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका आरोग्य सेविकेला केंद्राकडून फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार मिळाला याचा आनंद होत आहे. इतर कर्मचार्‍यांनीही शेख यांच्या कामाचे अनुकरण करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.’’ विठ्ठल लंघे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.