आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Health Scheme News In Marathi, Jivan Dayi Yojana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनदायी योजनेला अत्यल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दारिद्रय़रेषेखालील आणि एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारी स्तरावरून आवश्यक ते प्रयत्न करण्यात आले नसल्याने वीस दिवसांत केवळ 436 आरोग्यपत्रांचे वाटप करण्यात आले.
पिवळे, केशरी आणि अन्नपूर्णा रेशनकार्डधारकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योग्य व्यक्तींना लाभ मिळावा, यासाठी पोस्ट विभागातर्फे ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनापासून या योजनेची आरोग्यपत्रे लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात झाली. ही योजना सुरू होऊन वीस दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या योजनेच्या केवळ 436 आरोग्यपत्रांचे वाटप लाभार्थींना करण्यात आले. तांत्रिक अडचण आणि संबंधित लाभार्थींचे नाव या योजनेत नसल्याने अनेकांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि टपाल कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबामधील एखाद्या रुग्णावर उपचार करून घेण्यासाठी आरोग्यपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनाकडून रेशनकार्ड आणि आधारकार्डात संबंधित माहिती अपलोड झाली नसल्याने ही अडचण येत आहे. त्यामुळे आरोग्यपत्र देण्यात पोस्टाच्या कर्मचार्‍यांना अडचण येत आहे.
ती चूक लाभार्थी रेशनकार्डधारकांचीच
ज्यांनी संगणकीकरणासाठी अर्ज भरून दिला नाही, त्यांचा डाटा अपडेट झाला नाही. ही चूक लाभार्थ्यांची आहे. त्यांनी संगणकीकरणासाठी अर्ज भरून दिला असता, तर त्यांना आरोग्यपत्र मिळाले असते. आता मार्चअखेरपर्यंत संगणकीकरण अर्ज भरण्यात येतील. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना आरोग्यपत्र मिळतील. ’’ डॉ. वसीम शेख,
समन्वयक, जीवनदायी
पोस्टाकडून अडचण नाही
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही लाभार्थ्यांना आरोग्यपत्रांचे वाटप करत आहोत. वितरणासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोस्टाकडून कोणतीही अडचण नाही.’’ आर. ए. धस, वरिष्ठ पोस्टमास्तर.