आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rain And Road, Issue At Nagar, Divya Marathi

नगरकरांचे 200 कोटी गेले ‘खड्ड्यांत’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दोन दिवसांचा पाहुणादेखील महापालिका व लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडेल, अशी ऐतिहासिक नगर शहरातील रस्त्यांची सध्याची अवस्था आहे. वर्षानुवर्षे रस्ते व त्यांच्या पॅचिंगवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च मात्र थांबत नाही. आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाले असून 60 ते 70 कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. तरी देखील अभिमानाने नाव घेऊन सांगता येईल, असा एकही रस्ता शहरात नाही. एकाच रस्त्यावर वारंवार डांबर ओतून पैस हडपल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. शहरातील रस्ते म्हणजे अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदारांसाठी कुरण बनले आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया काही जाणकार नगरकरांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.
डांबरीकरण झालेले शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते असो, की नागरी वसाहतींमधील लहान-मोठे रस्ते, सर्वच रस्त्यांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, या रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून हा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट दिसते. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर देऊनही नगरकरांना धड रस्ते मिळत नाहीत. टिळक रस्ता, नेप्ती चौक ते पत्रकार चौक, सर्जेपुरा, कापडबाजार, चितळे रस्ता, पाइपलाइन रस्ता, गुलमोहर रस्ता, कुष्ठधाम रस्ता यारख्या अनेक प्रमुख रस्त्यांवर आतापर्यंत वारंवार खर्च करूनही त्यांची दुरवस्था कायम आहे. नगरोत्थान अभियानांतर्गत नव्याने हाती घेतलेल्या बालिकाश्रम, कोठी ते यश पॅलेस, केडगाव देवी रस्ता, भुतकरवाडी, शहाशरीफ दर्गा या रस्त्यांवरही सुमारे 55 कोटी खर्च करण्यात येत आहेत. परंतु कामाच्या दर्जाबाबत मात्र अधिकारी व पदाधिका-यांना काहीच देणे-घेणे नाही. त्यामुळे या नवीन रस्त्यांची अवस्थाही भविष्यात जुन्या रस्त्यांप्रमाणेच होणार असल्याचे जाणकार सांगतात. गेल्या दीड वर्षापासून या रस्त्यांची कामे रडतकढत सुरू आहेत. कामाची मुदत संपूनही आतापर्यंत केवळ 20 ते 30 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सर्वात मोठ्या 20 कोटी रुपये खर्चाच्या बालिकाश्रमसारख्या ‘मॉडेल’ रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी वर्षाचा कालावधी लागणार आहे.

...तर अधिकारी जेलमध्ये जातील
शहरात आतापर्यंत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली, तर महापालिकेचे निम्म्यापेक्षा अधिक अधिकारी जेलमध्ये जातील. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्याचे काम अधिका-यांचे आहे. परंतु हे अधिकारी दर्जा न तपासताच ठेकेदारांची बिले काढतात. लोकप्रतिनिधींचा अधिका-यांवर वचक राहिलेला नाही. अनेक वर्षांपासून ठराविक ठेकेदारांनाच कामे दिली जातात. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांची वाट लागली आहे.’’
जयंत येलूलकर, माजी नगरसेवक.
ठेकेदारांची सुरू आहे मनमानी
मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. वर्षभरात केवळ 15 टक्के काम पूर्ण होणे, ही महापालिकेची शोकांतिका आहे. रस्त्यांच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, परंतु मनपातील सत्ताधारी व विरोधकांना त्याचे काही देणे-घणे नाही. ठेकेदार मनमानी पध्दतीने जमेल तसे काम करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.’’
अर्शद शेख, अध्यक्ष, मुकुंदनगर विकास समिती.

अद्याप एकही रस्ता पूर्ण नाही
राज्य शासनाने सुमारे 55 कोटी रुपये खर्चाच्या शहरातील प्रमुख सात रस्त्यांच्या कामाला महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत चार वर्षांपूर्वीच मंजुरी दिली. त्यासाठी पहिल्या व दुस-या हप्त्यापोटी सुमारे 18 कोटींचा निधीदेखील दिला. मात्र, मुदत संपूनही यातील एकही रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत 22 रस्त्यांची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली, परंतु कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने यातील काही रस्ते उखडले आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा शहर अभियंत्‍यास केलेले थेट सवाल