आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर तालुक्याला पावसाने झोडपले; पुलांवरून पाणी, काही गावांचा संपर्क तुटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी - नगर तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. २००७ नंतर तब्बल १० वर्षांनी तालुक्यात १२० टक्के पाऊस झाला. अकोळनेर, चास, कामरगाव, सारोळा कासार, सोनेवाडी, अरणगाव , खडकी, वाळकी, देऊळगाव, गुंडेगाव, राळेगण, रूईछत्तीसी, हातवळण, पारगाव, निंबोडी, साकत, दहिगाव, मेहकरी, कौडगाव, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, पिंपळगाव उज्जैनी, निंबळक, नेप्ती, खातगाव, टाकळी, हिवरे बाजार, जखणगाव, चिचोंडी पाटील, सांडवे, मांडवे, मदडगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 
 
अकोळनेरचा सारोळा, खडकी, भोरवाडी, नगर यांच्याशी संपर्क तुटला. अकोळनेर आणि चास परिसरातील कोळगेवाडी येथील वाघदरा तलाव ओहरफ्लो झाल्याने तो फुटण्याच्या शक्यतेने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. अरणगावमधील पिंपळडोह तलावही ओसंडून वहात आहे. अकोळनेर-सोनेवाडी रस्त्यावरील छोटा पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला. खडकीच्या वालुंबा नदीला पूर आल्याने सारोळा कासार- खडकी रस्ता बंद झाला. तेथे पुलावरून पाणी वहात आहे. मेहकरी भागात काही घरांचे पावसाने नुकसान झाले. अरणगाव भागातही मोठा पाऊस झाला असून वाळकी रस्त्यावरील पुलाला पाणी लागले होते. 
 
दौंड रस्त्यावर खडकी येथील पुलावरून पाणी वाहत होते. रात्रीची वेळ आल्याने आणि अकोळनेर भागात मोठा पाऊस झाल्याने पाणी वाढत गेले. या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे होऊ शकते, म्हणून खडकी येथील सरपंच प्रवीण कोठुळे, अमोल कोठुळे, राष्ट्रपती आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक नामदेव धामणे वाहनचालकांना सूचना देत होते. 
 
अकोळनेरला ढगफुटी 
अकोळनेर परिसरात ढगफुटी झाल्याने चास, कामरगाव, सारोळा कासार, भोरवाडी, जाधववाडी या भागात प्रचंड पाऊस झाला. सुमारे तास पाऊस सुरू होता. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अकोळनेरचा इतर गावांशी असणारा संपर्क तुटला आहे. 
बातम्या आणखी आहेत...