आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस : दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने अहमदनगर मनपाची अब्रू चव्हाट्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरकरांवर वरुणराजाने गुरुवारी जोरदार कृपावृष्टी केली. दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. सखल भागात दीड ते दोन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. शहरातील सर्व सखल भागात अक्षरश: तळी साठली. तर रस्त्यांना ओढ्या नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणा-या नियोजनात कसर राहिल्यानेच महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आली.

मान्सून लांबल्याने नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. गुरुवारी सकाळपासून वातावरण ढगाळ होते. उकाडाही जाणवत होता. दुपारनंतर नगर शहर, केडगाव, चास, अरणगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नगरकरांना दिलासा मिळाला. शहरात 33 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच पावसाच्या पाण्याचा लगेच निचरा व्हावा, यासाठी नालेसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पहिल्याच पावसात महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पडले.

माळीवाडा बसस्थानक, सिद्धिबाग, टिळक रस्ता, अमरधाम, दिल्ली दरवाजा, सर्जेपुरा आदी परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पावसाचे पाणी साचले होते. गटारे स्वच्छ केली नसल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला. पावसाबरोबरच गटारंतील पाणी रस्त्यावर आले होते. अतिक्रमणांमुळे अदृश्य झालेले नाले व महापालिकेच्या उदासीनतेमुळेच नगरकरांची पहिल्याच पावसात त्रेधातिरपीट उडाली.

असे झाले हाल
पाऊस सुरू असतानाच शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी घराकडे निघाले. साचलेल्या पाण्यात अनेक ठिकाणी वाहने बंद पडली. खड्ड्यांमध्ये अडकून अनेक मोटारसायकलस्वार पडले. हे सारे घडले महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे, असा संताप नगरकरांमधून व्यक्त होत होता. त्यातच शहर बससेवा बंद असल्याने घरी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

का साचले पाणी?
शहरात अनेक भागात बंद पाइपगटारे आहेत. मात्र, नाल्याच्या दिशेने पाणी वाहण्यास आवश्यक पृष्ठभाग मिळत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा या गटारांवरील ढाप्यांतून होतो. ढापे रस्त्यावरच असल्याने अपघात होऊ नये, यासाठी पूर्णपणे उघडले जात नाहीत. पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास उशीर होऊन घरात पाणी शिरते. बंद पाइपगटारामुळे स्वच्छतेवर मर्यादा येतात. काही ठिकाणी ढापे स्लॅब टाकून बंद केले जातात. अशा परिस्थितीत पाण्याला मार्ग मिळत नसल्याने अनेक ठिकाणी दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचते.

जबाबदारी आरोग्य विभागाची
- पावसाच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हायला हवा, यासाठी आरोग्य व अतिक्रमण विभागामार्फत नालेसफाईचे काम सुरू आहे. गटारे स्वच्छ करण्यात येत आहेत. गटाराचे पाणी रस्त्यावर आले असेल, तर आरोग्य विभागाला तसे पत्र पाठवून कळवण्यात येईल.’’
नंदकुमार मगर, शहर अभियंता.

स्वतंत्र यंत्रणा नाही
- बंद पाइपगटारांची शक्य होईल तेवढी स्वच्छता केली आहे. तथापि, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा गरजेचे आहे. सांडपाण्याच्या गटारांतूनच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येतो. त्यामुळे गटारांतील गाळासह पाणी रस्त्यावर येते. यासंदर्भात संबंधित विभागाला वेळोवेळी कळवले आहे.’’ डॉ. एन. एस. पैठणकर, उपआरोग्य अधिकारी, मनपा.
नेवाशात जोरदार पाऊस

नेवासे शहरासह तालुक्यातील गोदावरी पट्ट्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाले. नेहमीप्रमाणे पहिल्या पावसात बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापा-यांची मात्र तारांबळ उडाली. दुपारी एकनंतर घोगरगाव, शिरसगाव, गोपाळपूर, वरखेड, भेंडा, कुकाणा परिसरात पावसाने हजेरी लावली. भालगावपासून, सलाबतपूर, गिडेगाव आणि भेंडा गावापर्यंत चांगला पाऊस झाल्याने ओढे-नाले व नद्यांना पाणी आले होते. या पट्ट्यात एक ते दीड तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील ऊस व कपाशीला जीवदान मिळाले आहे.
देवगड, मंगळापूर, सलाबतपूर, जळका, गिडेगाव येथेही दीड तास पाऊस झाला. घोडेगाव, सोनई भागात मात्र केवळ ढगाळ वातावरण होते. या भागात पाऊस पडला नाही. कर्जत तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी पावसाचे आगमन झाले. चापडगाव येथून पंढरपूरच्या पायी दिंड्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना पावसाचे आगमन झाले. कर्जतसह वालवड, माही जळगाव, मिरजगाव, भैरोबावाडी, राशीन, चापडगाव परिसरात दहा ते पंधरा मिनिटे हलकासा पाऊस झाला. राहुरी तालुक्याच्या काही भागात तुरळक सरी कोसळल्या.