आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाकाय टाक्यांनी नगर चक्का जाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील अंतर्गत रस्त्यावर अचानक चार महाकाय टाक्या वाहून नेणारे ट्रेलर शनिवारी सकाळी अवतरल्याने शहरातील वाहतूक तब्बल तीन ते चार तास मंदावली. वाहतूक शाखेचे कर्मचारीही धावले, तर महावितरणच्या कर्मचार्‍यांनी भारनियमनाचे वेळापत्रक बदलून वीज वाहक तारा काढल्या आणि या ट्रेलरना वाट मोकळी केली.

शहरातील नगर-औरंगाबाद महामार्गावरून सकाळी साडेआठच्या सुमारास चार महाकाय टाक्या घेऊन जाणार्‍या ट्रेलरनी केडगाव येथून शहरात प्रवेश केला. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरश: कोलमडून गेली. या अवजड वाहनांना शहरातून वाट मोकळी करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी धावले. तसेच महामार्गाची वाहतूक काही तास एकेरी करावी लागली. जिल्हा पोलिस अधीक्षक चौकातील मार्गदर्शक कमान दोन क्रेनच्या साह्याने काढली. हे ट्रेलर तारकपूरमार्गे वळवण्यात आले. दोन्ही बाजूला झाडे असल्याने बहुतेक झाडांच्या फांद्या तुटल्या. तारकपूर येथील झुलेलाल मंदिरासमोर वीज वाहक तारांचा अडथळा आल्याने ट्रेलर पुढे नेता येत नव्हते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी जिल्ह रुग्णालय व गुलमोहर भागातील फीडर बंद केले. यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर काम करून तातडीने तारांचा अडथळा दूर केला. या ट्रेलरबरोबर असलेले 65 कर्मचारीदेखील कोणतेही नुकसान होणार याची काळजी घेत होते. धिम्या गतीने हा महाकाय तांडा पुढे सरकत होता.
बोगद्यांचा अडथळा - पुणे येथून मुंबईकडे जायचे असताना हे ट्रेलर नगर मार्गे कसे गेले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पुणे - मुंबई द्रुतगती मार्ग असून बोगदे आहेत. त्यामुळे ट्रेलर नगर-नाशिक मार्गे मुंबईला पोहोचणार आहेत. तेथून हे ट्रेलर जहाजाने ओडिशाला जाणार असल्याचे समजले.
टाक्या रसायने साठवणुकीच्या इंडिंयन ऑइल कॉर्पारेशन लिमिटेड कंपनीच्या रसायने साठवणार्‍या टाक्या घेऊन चार व्हॉल्व्हो ट्रक चाकण एमआयडीसी येथून मुंबईकडे निघाले होते. एक ट्रेलर सुमारे 70 फूट लांब, 30 फूट उंचीचे असल्याचे ट्रेलरबरोबर असलेल्या कर्मचार्‍यांनी सांगितले. या ट्रेलरला टाक्या वाहतुकीची थेट राज्य शासनाची परवानगी होती.

महावितरणने साधली संधी.. - गेल्या काही दिवसांपासून ट्रेलर शहरातून नेण्यासाठी ट्रेलरचे कर्मचारी महावितरणच्या संपर्कात होते. मात्र, शनिवारी दुरुस्ती देखभालीचा दिवस असल्याने या दिवशी ट्रेलरला मार्ग रिकामा करून देण्यात आला, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे शहरातून ट्रेलर मार्गस्थ करून देण्यासाठी संबंधित कंपनीने महावितरणकडे सुमारे 1 लाख 35 हजार रुपयांचा भरणा केला. तसेच, मदतीला दिलेल्या 25 ते 30 कामगारांनाही वेगळे पैसे देण्यात आले. त्यामुळे महावितरणची दुरुस्ती देखभाल तर झालीच शिवाय रक्कमही मिळाली अशी दुहेरी संधी महावितरणने साधली.