आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा तिढा कायमच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अवजड वाहनांमुळे शहरात होणारी नित्याची वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात, यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने विधायक पाऊल उचलले. पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा होऊन मंजुरी मिळाली. त्यानुसार शहर हद्दीतून मार्गक्रमण करण्यास अवजड वाहनांना दिवसभरासाठी कायमची प्रवेशबंदी झाली. शहरातील अंतर्गत बाजारपेठेत येण्यासाठी अवजड वाहनांना रात्री १० वाजेनंतर प्रवेशाला मुभा मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना जारी केली खरी. पण, या अधिसूचनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीची अधिसूचना लागू झाली असली, तरीही ही वाहने अजूनही शहरात प्रवेश करतात. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही तसाच आहे. शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याने जाण्याऐवजी अवजड वाहने अजूनही शहरातून मार्गक्रमण करीत आहेत. अशा वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित असताना महामार्ग पोलिस चक्क गायब आहेत. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मात्र या वाहनचालकांवर अलीकडच्या काळात गुन्हे नोंदवले आहेत.

अपघातांना आळा बसावा, वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेशबंदीची अधिसूचना काढली होती. औरंगाबाद, मनमाडकडून पुणे कल्याणकडे जाणारी अवजड वाहने शेंडी-निंबळक-केडगाव बायपासमार्गे पुणे कल्याणकडे वळवण्यात आली. पुण्याहून मनमाड औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहने केडगाव-निंबळक-शेंडीमार्गे मनमाड औरंगाबादकडे वळवण्यात आली. शहर हद्दीत सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या आजूबाजूला अवजड वाहनांना उभे करण्यास प्रतिबंध आहे. तरीही या अधिसूचनेकडे अवजड वाहनचालकांकडून सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.

शहरवाहतूक शाखेचे पोलिस बायपासला जोडणाऱ्या चौकात थांबून अवजड वाहनांना बाह्यवळण रस्त्याने वाहतुकीच्या सूचना देतात. पण मनुष्यबळाअभावी तेथे पूर्णवेळ पोलिस कर्मचारी नेमणे अशक्य आहे. अवजड वाहनांनी प्रवेशबंदी असलेल्या वेळेत शहरात प्रवेश केला, तर वाहतूक पोलिस अशा वाहनांवर कारवाई करतात. मध्यंतरी अशा वाहनचालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. पण, महामार्ग पोलिसांकडून कारवाया होत नसल्यामुळे अवजड वाहने अजूनही प्रवेशबंदी झुगारून शहरात प्रवेश करतात. अशा बेकायदशीर प्रवेशामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम आहे.

दुसरीकडे अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचा राग शहर वाहतूक पोलिसांवर काढला जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेची डोकेदुखी वाढली आहे. औरंगाबाद महामार्गावर शुक्रवारी दुपारी शेंडी बायपास चौकामध्ये एका अवजड वाहनाखाली चिरडून दोघे ठार झाले. संतप्त जमावाने पोलिसांसमोरच ट्रकला आग लावली. त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातातील अवजड वाहनही नगर शहरातूनच मार्गक्रमण करीत होते. यावरून अवजड वाहतुकीचा प्रश्न अद्यापही जैसे थेच आहे. प्रशासनाने पुन्हा एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

औरंगाबाद मार्गावरून सर्रास प्रवेश
पुणे रोड ते सोलापूर रोड जोडणाऱ्या वाळुंज-अरणगाव-केडगाव या बाह्यवळणाचे काम पूर्ण झाले अाहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू आहे. मनमाडहून सोलापूरकडे जाणारी अवजड वाहतूक अद्यापही निंबळक ते शेंडी बायपासमार्गे शहरातून जाते. शेंडी बायपासपर्यंत आल्यानंतर वाहने औरंगाबाद रस्त्याने नगरमध्ये येतात. डीएसपी अधीक्षक चौक, कोठला, स्टेट बँक चौकातून ही वाहने साेलापूरला जातात. या वाहनांना ठरावीक वेळेतच शहरात प्रवेशबंदी होती. मात्र, अवजड वाहने बिनधास्त शहरातून जातात.

खासगी बसथांबे नगर शहरातच
पोलिसांनी सादर केलेल्या अधिसूचनेनुसार शहरात ठिकठिकाणी प्रवासी बसवण्यासाठी थांबणाऱ्या खासगी बसेसना शहराबाहेर बसथांबा देण्याचे ठरले होते. मात्र, या आदेशाचीही अंमलबजावणी झालेली नाही. तारकपूर परिसर, माळीवाडा बसस्थानकासमोर खासगी बसेस महामार्गावरच थांबून प्रवासी भरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात अवजड वाहनांची भर पडत असल्यामुळे तारकपूर परिसरातील पत्रकार चौक ते पोलिस अधीक्षक चौकापर्यंत दररोज रात्री सातनंतर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येते.
बातम्या आणखी आहेत...