आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाह्यवळण खड्ड्यांत; अवजड वाहने शहरात, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुरवस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अवजड वाहतूकही या रस्त्याने न जाता पुन्हा शहरातून सुरू झाली आहे.
वाढलेल्या वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. वर्षानुवर्षे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने नगरकरांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सन 2007-08 मध्ये बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तब्बल सहा वर्षे हे काम रेंगाळले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 1 फेब्रुवारीला तेव्हाचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा बाह्यवळण रस्ता घाईघाईने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बरीचशी कामे अर्धवट असतानाच त्यावरून वाहतूक सुरू झाली.
बाह्यवळण रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन शहरातील रहदारीवर पडणारा 50 टक्के ताण कमी होणार होता. पुणे, कल्याण, मनमाड, औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहतूक या बाह्यवळण रस्त्याने जाणे अपेक्षित होते. प्रारंभी वाहतूक शाखेच्या पोलिसांमुळे ही वाहतूक या रस्त्याने वळवण्यात यश आले. तथापि, या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक तेथून जाणे टाळू लागले. आता तर या रस्त्याने जाणे म्हणजे शिक्षा झाली आहे.
या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी महापौर संग्राम जगताप यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे १४ कोटींची मागणी केली होती. नंतर पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 14 कोटी रुपये देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले गेले. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणे अपेक्षित होते. तथापि, जुजबी पॅचिंग व्यतिरिक्त काम सुरू झालेले नाही.बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने औरंगाबाद व पुण्याहून येणारी अवजड वाहतूक सध्या शहरातूनच जात आहे. अवजड वाहनांची वाहतूक शहरातून पुन्हा सुरू झाल्याने चांदणी चौक, डीएसपी चौक, औरंगाबाद नाका, कोठला स्थानक, जीपीओ चौक, कोठी चौक, छत्रपती शिवाजी चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक या भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
कामाला लवकरच सुरुवात
बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 14 कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 14 कोटींचा निधी प्रशासनाला मिळाला आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून, दोन दिवसांपूर्वीच मी बाह्यवळण रस्त्याची पाहणी केली. या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.'' संग्राम जगताप, महापौर व आमदार.