आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहनांचे शहराला जड झाले ओझे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या सुधारित अधिसूचनेनंतरही अवजड वाहने बाह्यवळण (बाह्यवळण) रस्त्यावरून न जाता शहरातूनच जात आहेत. शहरातील रस्त्यांना या अवजड वाहनांचे ओझे जड झाले आहे. दरम्यान, बाह्यवळण रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक अवजड वाहने शहरातून आणत आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी 2007-08 मध्ये या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तब्बल सहा वर्षे या रस्त्याचे काम सुरूहोते. 1 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन शहरातील वाहतुकीवर पडणारा 50 टक्के ताण कमी होणार होता, तसेच इंधन वापरातही बचत होऊन शहरातून जाणार्‍या या अवजड वाहनांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणही कमी होणार होते. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिन्यांचा कालावधी झाला आहे, तरी पुणे, कल्याण, मनमाड, औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहतूक या रस्त्यावरून न जाता जुन्याच रस्त्यावरून जात आहे. याबाबत आमदार अनिल राठोड यांनीही जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेऊन अवजड वाहतूक बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. ‘दिव्य मराठी’ने 8 मे रोजी ‘बाह्यवळण रस्ता केवळ फलकापुरताच’ व 13 मे रोजी ‘शहराचा श्वास कोंडतोय अरुंद रस्त्यांमुळे’ या मथळयांखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरातून जाणार्‍या अवजड वाहतुकीबाबत नव्याने अधिसूचना जारी केली. विळदघाट-निंबळक-केडगाव हा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे पूर्वीच्या अधिसूचनेत बदल करून शहर वाहतूक शाखेने सुधारित अधिसूचनेत अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ठरावीक वेळ निश्चित केली आहे. सुधारित अधिसूचनेनुसार औरंगाबाद, मनमाड या शहरांकडून येणारी पुणे-कल्याण शहराकडे जाणारी अवजड वाहने शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे वळवण्यात आली आहेत.

पुण्याकडून मनमाड व औरंगाबादकडे जाणारी अवजड वाहने केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे औरंगाबादकडे वळवण्यात आली आहेत. तसेच नगर शहरातील एमआयडीसी व बाजारपेठेत येणार्‍या वाहनांना व सोलापूरकडून पुण्याकडे आणि पुण्याहून सोलापूरकडे जाणार्‍या अवजड वाहनांना सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत व रात्री आठ नंतर अवजड वाहतुकीला शहरातून जाता येईल.

महापालिका हद्दीतील कुठल्याही सार्वजनिक जागांवर किंवा रस्त्यावर अथवा रस्त्याच्या आजूबाजूला कंटेनर्स, ट्रेलर, वाहने घेऊन जाणारे कंटेनर्स ही अवजड वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला न जुमानता अवजड वाहतूक शहरातूनच सुरू आहे.