आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनांमुळे कोंडला बाजारपेठेचा श्वास, प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, अवजड वाहनांची रहदारी यामुळे शहराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली. त्यानुसार अवजड वाहनांना मुख्य बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी दिवसा, तसेच सायंकाळी बंदी घालण्यात आली. परंतु या अधिसूचनेला केराची टोपली दाखवत अवजड वाहने सर्रास बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. त्यामुळे बाजारपेठेचा श्वास पुन्हा एकदा कोंडला गेला आहे. चिंचोळ्या रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षी जून महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे, राज्य परिवहन विभागाचे नियंत्रक एस. टी. संवत्सरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजित साळुंके, जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजीत गलांडे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गेल्या वर्षी ऑगस्टला अधिसूचना जारी केली.

या अधिसूचनेनुसार शहरातील १३ अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी बसेससाठी शहराबाहेर थांबे देण्याचा निर्णय झाला. शहरातून मार्गक्रमण करणारी जड वाहने कायमस्वरुपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली. एमअायडीसी बाजारपेठेत येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री दहानंतर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील अवजड वाहतूक कायमस्वरुपी बाह्यवळण रस्त्याने वळवण्याची सूचना मांडली होती. तसे लेखी पत्र त्यांनी २७ जून २०१५ रोदी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

अॉगस्टला नवी अधिसूचना जारी करण्यात आली. आधीपासून जारी असलेल्या अधिसूचनेत काही बदल करुनच ही अधिसूचना काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, खासगी बसेस, सातत्याने होणारे अपघातांचे मुद्दे यादृष्टीने या अधिसूचनेला विशेष महत्त्व होते. बाह्यवळण रस्त्यांना जोडणाऱ्या चौकांमध्ये हायमॅक्स दिवे लावणे, शहरातील शाळा-महाविद्यालयांसमोर झेब्रा क्रॉसिंग बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. आता ही अधिसूचना जाहीर होऊन वर्ष होत आले, तरीही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे.

अवजड वाहने बाजारपेठेत येत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन दुचाकी चालकांचे फार हाल होतात. अनेकदा तासन््तास ही कोंडी सुटत नाही. छायाचित्रे: धनेश कटारिया
सर्व वळण रस्त्यांचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच असे चित्र दिसते.

कारवाई करायची कोणी?
नव्या अधिसूचनेनुसार अवजड वाहतूक पूर्णपणे बाह्यवळण रस्त्याने वळवणे अपेक्षित आहे. यापूर्वी अवजड वाहनांना ठरावीक वेळेपुरतीच शहरात प्रवेशबंदी होती. त्यामुळे शहर वाहतूक महामार्ग पोलिसांची नजर चुकवून अवजड वाहने शहरातून मार्गक्रमण करत होती. आताही अवजड वाहने अधिसूचना झुगारुन सर्रास शहरात प्रवेश करतात. अशा वाहनांवर शहर वाहतूक शाखेने महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणे, तसेच अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचे गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे, पण तसे होत नसल्यामुळेच अवजड वाहने दिवसाही शहरात प्रवेश करतात.

बाजारपेठेत अवजड वाहने
ऑगस्टच्या सुधारित अधिसूचनेनुसार एमअायडीसी बाजारपेठेत येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री दहानंतर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. अजूनही मुख्य बाजारपेठेत, दाळमंडई, तेलीखुंट वगैरे परिसरात भर दिवसा अवजड वाहने सर्रास प्रवेश करतात. या वाहनांमुळे बाजारपेठेतील चिंचोळ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी तासन््तास सुटत नाही. त्यामुळे बाजारपेठेचा श्वास मात्र कोंडला आहे. त्यामुळे सुधारित अधिसूचना जारी होऊनही वाहतूक कोंडीचे चित्र मात्र जैसे थेच आहे.

सर्व वळण रस्ते पूर्ण होणे आवश्यक
नगर शहराबाहेरुन जाणारे सर्व वळण रस्ते पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या औरंगाबाद रस्त्यावरुन मनमाड रस्ता, तसेच मनमाड रस्त्यावरुन कल्याण पुणे रस्ता, पुणे रस्त्यावरुन सोलापूर रस्ता असा वळण मार्ग तयार झाला आहे. तथापि, औरंगाबाद, कल्याण तसेच पुण्याकडून बीडकडे जाणारी अवजड वाहने शहरातूनच जातात. त्यामुळे शहरातील स्टेशन रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीची समस्या अजून सुटलेली नाही. तसेच या रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरांतर्गत रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्यासारखे आहे. त्यामुळे अवजड वाहनांना कोणीही रोखत नाही.

इतर विभागांनाही वावडे
स्टेशन रस्त्यावर बाजार समिती चौकामध्ये, सक्कर चौकापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या नित्याची आहे. बाजारपेठेतही अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे कोंडी होते. काही चौकांमधील सिग्नल बंद आहेत. मुळात शहरात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांची, शहर वाहतूक शाखेची, परिवहन विभागाची उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही आहे. मात्र, हे सर्व विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना डावलून अवजड वाहने बाजारपेठेत येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...