ओतूर- मुंबई मराठा क्रांती मोर्चाहून परतत असताना अपघातात दगावलेल्या रोहोकडी येथील हर्षद घोलप याच्या कुटुंबीयांची छत्रपती संभाजी राजेंनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. छत्रपती संभाजी राजेंनी सांत्वन करतानाच वैयक्तिक एक लाख रुपये मदतीचे आश्वासन दिले. तसेच मुंबई मराठा क्रांती मोर्चातील या सर्व अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपये मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मृत हर्षदच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. हर्षद हा या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. वडील मानसिक आजाराने त्रस्त असून विवाहित मुली परगावी रहात असल्याने हर्षदच्या मातेची केविलवाणी अवस्था पाहून छत्रपती संभाजीराजेही गहिवरले. कुडाच्या छपरात राहणाऱ्या या कुटुंबाला खऱ्या अर्थाने समाजातून पाठबळ मिळण्याची निकड संभाजीराजेंना जाणवली. विशेष म्हणजे मृत हर्षद घोलप ज्या पुण्यातील डी. वाय. पाटील संस्थेत शिकत होता, त्या संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याशी फोनवरून बोलणी करून संंभाजीराजेंनी मृत हर्षदच्या दोन्ही सुशिक्षित बहिणींपैकी एकीला, तरी संस्थेत कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत चर्चा केली. यावर सतेज पाटील यांनी ती मान्य करीत या कुटुंबाला फार मोठा दिलासा दिला.
छत्रपती संभाजीराजेंच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल ग्रामस्थ समाजातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजू देवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान घोलप, रोहोकडीच्या सरपंच सुनीता घोलप, सचिन घोलप, महेश मुरादे, शांताराम मुरादे, नवनाथ मुरादे, महेश घोलप, नीलेश घुले, राहुल काळे, योगेश डुंबरे, अवधूत शिंगोटे, पांडुरंग हिंगणे, ईश्वर केदारी, तुकाराम हिंगणे, नामदेव घोलप, माजी सरपंच, सुदाम घोलप, शिवशंकर घोलप आदी ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाहून परत असताना मृत्यू झालेल्या मृत हर्षद घोलप याच्या कुटुंबीयांची रोहोकडीत भेट घेऊन सांत्वन केले.