आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांनी अनुभवला नगरकरांच्या माणुसकीचा झरा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-सोलापूर येथील कोतागुंडा कुटुंब भिवंडी येथून सोलापूरकडे निघाले होते. प्रवासात त्यांच्या आजारी मुलीचा मृत्यू झाला. हे कुटुंब गरीब असल्याने त्यांच्याकडे परतीच्या प्रवासासाठीही पुरेसे पैसे नव्हते. नगर येथील एक पोलिस कर्मचार्‍यासह इतर नागरिकांनी त्यांना मदतीचा हात दिला. नगरकरांची माणुसकी पाहून कोतागुंड कुटुंबीयांनी मनापासून धन्यवाद दिले.

सोलापूर येथील शिंदे वस्तीवर राहणारे हे कुटुंब भिवंडीहून परतत होते. नगर येथील माळीवाडा एसटी स्थानकात शनिवारी (4 जानेवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास बसमधून खाली उतरत असताना आजारी मुलगी भाग्यर्शीला (18) उतरवण्यासाठी वडील मल्लिकार्जुन कोतागुंडा यांनी एका प्रवाशाकडे मदत मागितली. त्यावेळी मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. कुटुंबियांना रडूच कोसळले. कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नसल्याने भाषा समजण्यातही अडचण. बसस्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेता मिथून पवार, पोलिस कर्मचारी महादेव फाळके व प्रवासी प्रशांत सहस्त्रबुद्धे यांना ही घटना समजली. त्यांनी मातंग एकता आंदोलनच्या सरचिटणीस चंद्रकांत काळोखे यांना बोलावून घेतले. कोतागुंडा कुटुंब मजुरी करणारे असल्याने त्यांच्याकडे केवळ प्रवासापुरतेच पैसे होते. मुलीचे पार्थिव गावी नेण्यासाठी स्वतंत्र वाहन करायला पैसे नव्हते. फाळके व काळोखे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये दिले. इतर प्रवाशांकडून मिळालेल्या मदतीतून 3 हजार 700 रुपये जमा झाले. नंतर पोपट गर्जे यांनी त्यांच्या खासगी ओमिनीतून या कुटुंबाला सोलापूरला घरी पोहोचवले.