नगर - अठराव्या शतकाच्या अखेरीस गंगाराम चिंतामण तांबट नावाच्या चित्रकाराच्या चित्रांनी पाश्चिमात्त्यांनाही भुरळ घातली होती. तांबट यांनी काढलेली अनेक चित्रे सध्या इंग्लंड, अमेरिकेत आहेत. या चित्रकाराविषयी अधिक माहिती घेण्याचे काम सध्या एक अमेरिकन संशोधक करत आहे. त्यांचे नाव आहे होली शेफर.
होली अमेरिकेतील येल विद्यापीठात डॉक्टरेटसाठी संशोधन करत आहेत. या संशोधनाचा भाग म्हणून त्यांचा सतराव्या-अठराव्या शतकातील मराठेशाहीतील चित्रांचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी सध्या त्या भारतात आल्या असून पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये तज्ज्ञांच्या मदतीने संशोधन करत आहेत. नुकत्याच त्या नगरला येऊन गेल्या.
येल विद्यापीठातील ब्रिटिश चित्रांच्या संग्रहात गंगाराम तांबट यांची अनेक चित्रे आहेत. त्यातील काही चित्रांखाली ‘गंगाराम चिंतामण तांबट’ यांच्या नावाबरोबर अहमदनगरचा उल्लेख आहे. काही चित्रांत ‘तांबट-नवगिरे’ असाही उल्लेख आहे. निझामशाहीतील सर्वात सुंदर वास्तू म्हणून ओळखल्या जाणार्या फराहबक्श महालाचे रंगीत चित्र तांबट यांनी काढले आहे. विशेष म्हणजे या चित्रात महालाभोवती भरपूर वृक्ष असलेले उद्यान असून सभोवतालच्या तलावात नावही दाखवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नगरमधील एका अष्टकोनी महालाच्या पायाचा आराखडाही तांबट यांनी काढला आहे. त्यावरून त्यांना अभियांत्रिकीचे चांगले ज्ञान होते, हेही स्पष्ट होते. तांबट यांनी आपल्या गुरू भिक्षू मुनी यांचे चित्र काढले असून ते नगरजवळ राहत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तांबट हेही मूळचे नगरचे असावेत, अशी शक्यता होली यांनी व्यक्त केली.
पेशवाईच्या अखेरच्या काळात सर चार्लस मॅलेट पुण्याला अँम्बॅसेडर म्हणून नियुक्त झाला. त्याला कलेची विशेष आवड होती. त्याच्या सांगण्यानुसार पेशव्यांनी शनिवारवाड्यात चित्रशाळा सुरू केली. या चित्रशाळेत शिकण्याची संधी गंगाराम तांबट यांना मिळाली. हा काळ 1790-95 हा असावा. त्यांनी काढलेली वास्तवदर्शी चित्रे मॅलेटला फार आवडली. त्याने तांबट यांना अजिंठा, वेरूळला पाठवून तेथील लेण्यांची चित्रे काढण्यांची कामगिरी त्यांच्यावर सोपवली. ही चित्रे मॅलेट मायदेशी घेऊन गेला. त्यातील काही चित्रे सध्या अमेरिकेतील येल विद्यापीठात आहेत.
फराहबक्शला भेट
संशोधन करणार्या होली शेफर यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठात ‘गंगाराम चिंतामण तांबट - द हिडन इंडियन आर्टिस्ट इन ए ब्रिटिश अर्काव्हज’ या विषयावर ऑक्टोबर 2011 मध्ये व्याख्यान दिले होते. होली यांनी नुकतीच नगर येथील फराहबक्श महालाला भेट दिली. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील चित्रांचीही त्यांनी माहिती घेतली. या माहितीचा त्यांना संशोधनासाठी उपयोग होणार आहे. चित्रकार तांबट व त्यांच्या गुरुविषयी नगरमधील कोणाला माहिती असल्यास 9881337775 या क्रमांकावर संपर्क साधावा.