आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहेरबाबांची झोपडी, टेबल हाऊस आणि धुनी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अवतार मेहेरबाबांनी १९२३ मध्ये अरणगाव परिसरात पहिल्यांदा भेट दिली, त्या लिंबाच्या झाडापासून त्यांच्या समाधीपर्यंतचा प्रवास शनिवारी हेरिटेज वॉकमध्ये उलडण्यात आला. यानिमित्ताने मेहेरबाबांनी केलेल्या आध्यात्मिक आणि मानवतावादी कार्याची ओळख करून घेण्यात आली. 

नगरपासून सहा किलोमीटर अंतरावर दौंड रस्त्यावर मेहेराबाद वसलं आहे. मेहेरबाबांची ही कर्मभूमी. दीनदलितांसाठी, कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आपल्या लोकोत्तर कार्याची सुरूवात येथून केली. सत्तरपेक्षा जास्त देशांत आज मेहेरप्रेमी आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरमधील नागरिकांना मेहेराबाद परिसराची माहिती व्हावी, म्हणून स्वागत अहमदनगरच्या वतीनं हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. पहिल्या महायुद्धात जिथे ब्रिटिशांची लष्करी छावणी होती, तो परिसर आता आध्यात्मिक कार्यासाठी ओळखला जातो.

मेहेरबाबा आणि त्यांच्या मंडळींना पाणी पुरवणारी विहीर, घमेला योग करून अवघ्या दहा दिवसांत बांधण्यात आलेलं झोपडी नावाचं घर, १४ फूट लांब, फूट उंच आणि फूट रूंद असलेले टेबल हाऊस, राहुरी केबीन, दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेटवलेली धुनी, गुलेरीबाबांची समाधी, मेहेरबाबांच्या वस्तू असलेलं संग्रहालय आणि ग्रंथालय, स्वयंपाकघर अशा अनेक गोष्टी या हेरिटेज वॉकमध्ये पाहता आल्या. सगळ्या धर्मांचं प्रतीक असलेल्या घुमटाकृती वास्तूतील समाधीचं दर्शन सगळ्यांनी घेतलं. मेहेरबाबा आणि त्यांच्या कार्याविषयी मधुकर डाडर यांनी सांगितले. मेहेराबादच्या टेकडीवर मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आलं आहे. त्याची माहिती विश्वस्त रमेश जंगले यांनी दिली. काही परदेशी भाविकांनीही मेहेराबादमध्ये ते करत असलेल्या कामाची माहिती दिली. 

मेहेरबाबांची पतंगाची चकरी 
मेहेरबाबा मुलांमध्ये, पशू-पक्ष्यांमध्ये रमत. त्यांना क्रिकेटची आवड होती. लहान मुलांबरोबर ते गोट्या खेळत, पतंग उडवत. त्यांच्या काळातील पतंग आता उपलब्ध नसला तरी मांजा असलेली चकरी मेहेरबादच्या टेकडीवरील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. क्रिकेटची बॅट आणि गोट्याही तिथे आहेत.