आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर पोलिस वांजोळीत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पिंपळाच्या झाडाखाली असलेले गुप्तधन मिळवण्यासाठी नेवासे तालुक्यातील वांजोळी येथे नरबळी देण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी तब्बल 17 दिवसांनी पोलिसांना जाग आली आहे. बुधवारी दुपारी शेवगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील व सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन वांगडे व पोलिस पथकाने वांजोळी गावात हजेरी लावली. सुमारे तीन तास कसून चौकशी करीत उपअधीक्षक पाटील यांनी नरबळी प्रकरणाची माहिती घेतली.
वांजोळीतील शेतकरी किशोर खंडागळे यांच्या शेतात 24 मेच्या रात्री काहीजणांनी नरबळी देण्याचा प्रयत्न केला. पण भजनी मंडळ व ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडला. ग्रामस्थांनी नरबळीच्या पूजेला बसलेले एक दाम्पत्य, पांढरीच्या पुलावरील एक व्यक्ती, लोहोगावातील एक व्यापारी, तसेच काही मांत्रिकांना पूजा साहित्यासह ताब्यात घेतले होते. नंतर सोनई पोलिसही घटनास्थळी आले होते. मात्र, गावातील एका राजकीय पुढायाने ‘अर्थपूर्ण मध्यस्थी’ करुन कोंडलेल्या लोकांची सुटका केली. या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही ग्रामस्थांना देण्यात आली.
पुढायाच्या दहशतीमुळे गावातील कोणीच या प्रकाराविषयी बोलायला तयार नव्हते. काही लोकांनी याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. परंतु त्यांनाही धमकावण्यात आले. या प्रकाराला वाचा फोडत ‘दिव्य मराठी’ व ‘अंनिस’ने घटनास्थळी भेट दिली. तेथे पूजेचे काही साहित्य आढळून आले. याप्रकरणी ग्रामस्थांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण ज्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही धमक्या सुरूच होत्या. एवढा गंभीर प्रकार होऊनही सोनई पोलिस घटनास्थळी फिरकले नव्हते.
बुधवारी (11 जून) मात्र शेवगाव उपविभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील यांनी वांजोळीत हजेरी लावली. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक वांगडे हेही हजर होते. उपअधीक्षक पाटील यांनी किशोर खंडागळे यांच्या शेतातील पिंपळाचे झाड, ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देत परिसराची पाहणी केली. नंतर पोलिस पाटील व काही ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयात बसून त्यांनी घटनेची माहिती घेतली. ‘त्या’ रात्री पोलिसांशी अर्थपूर्ण तडजोड करणारा गावातील राजकीय पुढारीही यावेळी उपस्थित होता.

‘तो’ शेतकरी अचानक गायब

वांजोळीतील ज्या शेतकयाच्या शेतामधील पिंपळाच्या झाडाखाली नरबळी देण्याचा प्रकार हाणून पाडण्यात आला, तो शेतकरी बुधवारी दुपारी अचानक गायब झाला. शुक्रवारी (6 जून) दुपारी ‘दिव्य मराठी’ व काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या शेतकयाने नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, त्यानंतर तो दोन दिवस बेपत्ता होता. बुधवारी दुपारी पोलिस अधिकारी चौकशीकरिता वांजोळी गावात आले, तेव्हाही तो बेपत्ता होता. पोलिस त्याच्या शेतात गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप लावलेले आढळले. त्या शेतकयाच्या अचानक गायब होण्यामागे कोणाचा हात आहे, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

पुढायाची धार्मिक सहल
नरबळी प्रकरणात ग्रामस्थांनी पकडलेल्या लोकांना वाचवणारा राजकीय पुढारी प्रकरण दडपण्यासाठी वांजोळीच्या ग्रामस्थांना भीती घालत आहे. ही बाब ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणल्यानंतर आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा आव आणायला त्याने सुरूवात केली. गावाची अबू्र जाऊ नये, म्हणून आपण झटत असल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न तो करत आहे. स्वत:ची प्रतिमा अतिशय स्वच्छ असल्याचे दर्शवण्यासाठी नुकतीच त्याने एक ‘धार्मिक सहल’ही काढली होती. मंगळवारी तो पुन्हा गावात प्रकटला. पोलिस अधिकारी नरबळी प्रकरणाची चौकशी करायला आले, तेव्हा तो घटनास्थळी उपस्थित होता.

पूजेचे साहित्य केले गायब
मंगळवारी (10 जून) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी पुन्हा एकदा वांजोळीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. मध्यंतरी आढळून आलेले पूजेचे साहित्य गायब केल्याचा प्रकार यावेळी समोर आला. ही बाब पोलिस अधीक्षकांच्या कानावर घालण्यासाठी अ‍ॅड. गवांदे यांनी नगरला धाव घेतली. पण पोलिस अधीक्षक भरती प्रक्रियेत व्यग्र होते. त्यामुळे गवांदे यांनी त्यांना दूरध्वनीवरुनच नरबळी प्रकाराची माहिती दिली. नंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात या प्रकरणाबाबत लेखी निवेदन देण्यात आले.