आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग चौपदरी करणाच्‍या कामात नियमांना खो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर ते औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरण करताना अशोका बिल्डकॉन प्रा. लि. कंपनीने मार्गालगतच्या झाडांची कत्तल केली. पण, अटीनुसार नवीन झाडे लावणे व 99 झाडांचे प्रत्यारोपण करणे बंधनकारक असताना कंपनीने 1 हजार 361 झाडे कमी लावली. 99 झाडांचे प्रत्यारोपण केले नाही. त्यामुळे कंपनीच्या अध्यक्ष व संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर यांनी केली.
याबाबत भोर यांनी दीड वर्षापूर्वी उपविभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. यामध्ये म्हटले की, नगर-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन प्रा. लि. या खासगी कंपनीने केले. चौपदरीकरण करताना रस्त्यालगतचे सुमारे 1 हजार 734 वृक्ष कंपनीने तोडले. बदल्यात कंपनीने प्रति झाडामागे 5 नग झाडे ट्री गार्डसह लावणे व 99 वृक्षांचे प्रत्यारोपण करणे बंधनकारक होते. पण, कंपनीने तसे केलेले नाही. त्यामुळे कंपनीविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 व महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन अधिनियम 1975 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भोर यांनी केली होती. महसूल विभागाने केलेल्या चौकशीत कंपनीने चुकीची माहिती दिली, असा आरोपही भोर यांनी केला. यावर कंपनीने झाडांची कत्तल केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले. झाडे तोडण्याचा जाहीर लिलाव करून ठेका देण्यात आला. कंपनीने कोणतेही झाड तोडले नाही, असा खुलासा अशोका कंपनीने केला.
त्यावर भोर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत कंपनीने कमी झाडे लावल्याचे व 99 झाडांचे प्रत्यारोपण केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतही वृक्षतोडीच्या बदल्यात स्थानिक जातीची झाडे ट्री गार्डसह लावलेली नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांनी कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांनी सप्टेंबर 2013 मध्येच दिलेला आहे. पण, अजून कारवाई झालेली नसल्यामुळे शिवराज्य पक्ष न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भोर यांनी दिला आहे.

फौजदारी कारवाई व्हावी
अशोका बिल्डकॉन कंपनीने वृक्षांची बेकायदा कत्तल केली. नवीन झाडे लावणे बंधनकारक असताना ती लावली नाही. त्यामुळे कंपनीच्या अध्यक्ष, संचालकांवर फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी आता न्यायालयात जाऊ.’’ संजीव भोर, प्रदेश उपाध्यक्ष, शिवराज्य पक्ष.