आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Historical Identity, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख, मनपा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अरणगावजवळ असलेले मेहेराबाद, बारादरीजवळ असलेला चांदबिबीचा महाल आणि मांजरसुंभ्याजवळ असलेले निसर्गरम्य डोंगरगण अशा तीन वेगवेगळ्या दिशांना असलेल्या स्थळांसह विविध ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गरम्य ठिकाणांना एकाच दिवशी भेट देण्याचा उपक्रम महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांनी रविवारी केला. निमित्त होते जागतिक पर्यटन दिनाचे.
सकाळी सात ते संध्याकाळी सात अशा बारा तासांत नगरच्या भटकंतीचा उपक्रम केंद्राचे मानद संचालक प्रा. एन. बी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. सुरुवात झाली नगरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहेराबादपासून. अवतार मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन व त्यांच्या वस्तूंचे संग्रहालय पाहिल्यानंतर मार्केट यार्डजवळील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजींचे स्मृतिस्थळ असलेल्या आनंदधामला भेट देण्यात आली. कमळाकृती स्मारक, धार्मिक परीक्षा बोर्डमधील काचचित्रे असलेले सभागृह तसेच आनंदऋषीजींचे आसन, त्यांच्या हस्ताक्षरातील लेखन असलेली वही व अन्य वस्तू पाहताना जैन धर्माची तत्त्वे आिण आचार्यांचे लोकोत्तर कार्यही समजावून घेण्यात आले.
नंतर मंडळी पोहोचली निझामशाहीतील वैभवाचा साक्षीदार असलेल्या सोलापूर रस्त्यावरील फराहबक्ष महालाजवळ. एकेकाळच्या या रंगमहालात पुन्हा गाण्याचे स्वर निनादताच त्याकाळच्या आठवणीत सगळे हरवून गेले. पुढचा टप्पा होता आशियातील एकमेव असलेले रणगाडा संग्रहालय. रणगाड्यांचा शंभर वर्षांचा इतिहास सांगणारे विविध देशांचे रणगाडे पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. या संग्रहालयासमोरच्या उद्यानात असलेला बोलणारा पोपट, "क्वॅक क्वॅक' करत फिरणारी बदकांची जोडी आणि लव्हबर्डस् सहलीच्या आनंदात भर घालणारी ठरली.
नंतर जामखेड रस्त्यावरील हत्ती बारव, सारोळामार्गे बारादरीजवळच्या चांदबिबी महाला (सलाबतखान मकबरा) जवळील वन विभागाच्या निसर्ग माहिती केंद्राला भेट देण्यात आली. नगर जिल्ह्यातील वनसंपदेचे दर्शन घडवणारी दोन दालने तेथे आहेत. चांदबिबी महालाच्या हिरवळीवर वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढचे ठिकाण होते औरंगजेबाच्या अखेरच्या काळातील वास्तव्य असलेले भिंगारजवळील आलमगीर. तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या संग्रहालयात ओरंगजेबाची मुलगी वाचत असलेल्या पवित्र कुराणाची प्रत पाहायला मिळाली.
आलमगीरनंतर भुईकोट किल्ला. तटबंदी, झुलता पूल, वेलस्ली पॉइंटवरील तोफा पाहिल्यानंतर "चले जाव' आंदोलनात राष्ट्रीय नेत्यांना जिथे बंदिवासात ठेवण्यात आले, त्या नेता कक्षाला भेट देण्यात आली. किल्ला पाहिल्यानंतर मेहेराझाद, पिंपळगाव माळवीमार्गे मंडळी पोहोचली मांजरसुंभ्याजवळच्या दरीत वसलेल्या डोंगरगणमध्ये. बरोबर आणलेली झाडांची रोपे तिथल्या ओढ्याकाठी लावून सहलीची सांगता झाली. प्रश्नमंजुषेतील बक्षिसांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सहलीतील स्थळांची माहिती भूषण देशमुख यांनी दिली.

एकाच ठिकाणाहून दिसतात पंधरा तलाव
चांदबिबी महालाच्या छतावरून नगर शहर आणि परिसराचे विहंगम दृश्य पाहण्याची मौज काही औरच आहे. गर्भगिरीच्या डोंगरावर असलेल्या वीज तयार करणाऱ्या विशालकाय पवनचक्क्या आणि परिसरातील सुमारे १५ तलाव येथून दिसतात. यंदा झालेल्या पावसामुळे डोंगरावरील झाडे चांगली तरारली आहेत.