आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा नगरचा: मराठे-इंग्रज लढाईचे स्मारक ते संतकवी टिळकांचे कौलारू घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या वसंत टॉकीज परिसरात असलेले रेव्हरंड ना. वा. टिळक लक्ष्मीबाई टिळकांचे वास्तव्य असलेले कौलारू घर. - Divya Marathi
जुन्या वसंत टॉकीज परिसरात असलेले रेव्हरंड ना. वा. टिळक लक्ष्मीबाई टिळकांचे वास्तव्य असलेले कौलारू घर.
नगर- मराठे आणि इंग्रजांच्या १८०३ मध्ये माळीवाडा वेशीजवळ झालेल्या लढाईचे स्मारक ते ‘फुला-मुलांचे कवी’ अशी ओळख असलेल्या रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांचे अनेक वर्षे वास्तव्य असलेले घर अशी भटकंती रविवारी सकाळी ‘हेरिटेज वॉक’मध्ये करण्यात आली. 

‘स्वागत अहमदनगर’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माळीवाडा परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक सांस्कृतिक स्थळांबरोबर मल्लविद्येची जोपासना करणाऱ्या जुन्या तालमींना भेट देण्यात आली. इंग्रजांनी ऑगस्ट १८०३ रोजी नगर शहरावर आक्रमण केले, तेव्हा दौलतराव शिंद्याच्या सैन्याबरोबर झालेल्या लढाईत काही इंग्रज अधिकारी मारले गेले. त्यांच्या नावांचा उल्लेख असलेली काळी संगमरवरी शिळा माळीवाडा वेशीजवळ आहे. 

सन १६३१ बांधण्यात आलेली वेस, तेथील महात्मा फुलेंचा पुतळा, १९४२ च्या लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेली शिळा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेशमूर्तींपैकी एक असलेला नाथपंथी विशाल गणेश, या मंदिरासमोर असलेली शहरातील सर्वांत जुनी गणपतीची तालिम, त्याखाली असलेले तळघर पाहिल्यानंतर जुन्या वसंत टॉकिजजवळ असलेल्या रे. टिळकांच्या कौलारू घराला भेट देण्यात आली. याच घरात बालकवींचेही काही काळ वास्तव्य होते. लक्ष्मीबाईंनी आपल्या स्मृतिचित्रात या घराविषयीच्या आठवणी लिहिल्या आहेत. टिळकांच्या समाधीवर लिहिलेल्या काव्यपंक्ती पोपट धामणे यांनी यावेळी उद््धृत केल्या. माळीवाड्यात कवठाच्या झाडाखाली असलेली कौठीची तालीम, तसेच जुन्या आयुर्वेद महाविद्यालयालाही भेट देण्यात आली. तालमीची माहिती अजय पटवेकर यांनी दिली. 

एसटीचे पहिले वाहक 
महाराष्ट्रातपहिल्यांदा एसटी बस धावली ते नगर-पुण्यादरम्यान. वेशीजवळ असलेल्या वडाच्या झाडाजवळून एसटीचा प्रवास सुरू झाला, तेव्हा कंडक्टर होते लक्ष्मणराव केवटे. माळीवाड्यात राहणारे केवटे आता ९३ वर्षांचे आहेत. त्यांनी जून १९४८ च्या एसटीच्या पहिल्या प्रवासाच्या आठवणी या वेळी सांगितल्या. निळ्या रंगाची बेडफोर्ड गाडी, ट्रिप्लिकेट तिकिटांची पद्धत, इलेक्ट्रिक घंटा, खासगी एसटी बसमध्ये असलेली व्यावसायिक स्पर्धा अशा अनेक गोष्टी ऐकताना सगळे भारावले होते. 
बातम्या आणखी आहेत...