आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक फराहबख्क्ष महालाची गाथा आज उलगडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- चार शतकांहून अधिक काळ नगरच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला फराहबख्क्ष महाल रविवारी जुन्या वैभवाच्या आठवणींना उजाळा देणार आहे. भारतातील या पहिल्या ऑडिटोरियममध्ये पुन्हा एकदा काव्य-वादन-गायनाचा प्रयोग केला जाणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. नगर शहराची मुहूर्तमेढ सन १४९० मध्ये रोवली गेली. सध्या शहराचे ५२५ वे स्थापना वर्ष सुरू आहे. हे औचित्य साधून शहरातील ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे व संस्थांची ओळख करण्यासाठी "दिव्य मराठी'च्या वतीने "सिटी वॉक' उपक्रम राबवला जातो.
या उपक्रमांतर्गत रविवारी (१८ जानेवारी) सकाळी ९ वाजता नगर-सोलापूर रस्त्यावरील रणगाडा संग्रहालयाच्या अलिकडे असलेल्या फराहबख्क्ष महालाला भेट देण्यात येणार आहे. प्रारंभी परिसरात फिरून या वास्तूचा इतिहास जाणून घेण्यात येईल. नंतर मधुकरराव चौधरी ब्रह्मवीणा वादन करतील, तर गायक पवन नाईक काही गीते सादर करतील. विजेची सोय नसताना पूर्वी या रंगमहालात कशा प्रकारे कार्यक्रम होत, हे उमगण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन संजीव तनपुरे करतील.

बहारदार कविसंमेलन
फराहबख्क्ष महालाचे उद्घाटन मुशायऱ्याने झाले होते. ती आठवण जागी करण्यासाठी होणाऱ्या कविसंमेलनात चंद्रकांत पालवे, सतीश डेरेकर, किरण डहाळे, अनिल चौधरी, लियाकत अली सय्यद, अमोल बागूल, संजीव तनपुरे यांच्यासह शहरातील अन्य कवी सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी रसिक ग्रूपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, चित्रकार योगेश हराळे, उमेश गावडे, भाऊसाहेब पांडुळे, असिफ शेख, दीपक परदेशी, संजय भिंगारदे, बबलू ससे, विजय शिपलकर, धर्मा कारंडे व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.
स्वर्गीय संगीताचा अनुभव
वीणा हे भारतीय सांगीतिक इतिहासातील सर्वात प्राचीन वाद्य. ब्रह्मवीणेला दोन भोपळे व ब्रिजवर दोन तारा असतात. आकर्षक मिंडकारी, संुदर गमक व द्रूत लयीतील "झाला' ब्रह्मवीणेवर ऐकतच राहावा, असा असतो. कर्नाटकातील प्रसिद्ध ब्रह्मवीणावादक स्वामी श्रीरामकृष्णमहाराज चौधरी यांनी या वाद्याला लोकमान्यता मिळवून दिली. त्यांचे चिरंजीव मधुकरराव यांनी अभियंता म्हणून काम करत असताना कलेचा हा वारसा जपला.

इराणमध्ये कार्यक्रम
पवन नाईक यांनी डॉ. विकास कशाळकर (पुणे), सुरेश साळवी, डॉ. मधुसूदन व कुमुदिनी बोपर्डीकर, रेवणनाथ भनगडे, रघुनाथ केसकर, वीणा कुलकर्णी, डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यांच्या गझला आणि सुफी संगीताची ख्याती भारताबाहेरही पोहोचली आहे. इराणमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत महाेत्सवात आपली कला सादर करण्याची संधी पवन यांना मिळाली आहे.