आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी अनुभवला नगर जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवाशातील मोहनीराजांच्या मंद‍िरावरील आकर्षक श‍िल्पे. - Divya Marathi
नेवाशातील मोहनीराजांच्या मंद‍िरावरील आकर्षक श‍िल्पे.
नगर - जिथे खऱ्या अर्थाने शिवशाहीची पायाभरणी झाली, जिथे मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास घडला, त्या अहमदनगर शहराचा जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास ऐकताना विद्यार्थी रमले होते. नेवासे तालुक्यातील सोनई येथील यशवंत स्टडी क्लब यश अकॅडमी सीबीएसई स्कूलच्या वतीने पत्रकार भूषण देशमुख यांचे नगरच्या इतिहासावरील व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले.
यशवंत स्टडी क्लबचे संचालक तथा जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश विष्णू गायकवाड, मुळा शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीिडयम स्कूलचे संचालक हेमंत शर्मा, यश अकॅडमीच्या प्राचार्य लता पाटील, प्राचार्य मनीषा साठे, प्राचार्य योगेश्वरी पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. प्रारंभी सोनई नेवासे तालुक्याची ऐतिहासिक, धार्मिक ओळख करून देऊन देशमुख यांची नगर जिल्ह्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये कथन केली. नंतर अहमदनगर शहराच्या स्थापनेचा इतिहास उलगडून दाखवताना ते म्हणाले, या शहराची स्थापना स्वाभिमान जपण्यासाठी झालेल्या एका लढाईतील विजयाप्रीत्यर्थ करण्यात आली. अहमद निझामशहाने बहामनी सैन्याचा सेनापती जहांगीर खानावर गनिमी काव्याने २८ मे १४९० रोजी जिथे विजय मिळवला, त्या जागेवर "कोटबाग निझाम' नावाचा महाल बांधला. पुढे याच ठिकाणाची त्याने राजधानीसाठी निवड केली. सीना नदी आणि भिंगार नाल्याच्या पाण्यावर राजधानीची तहान भागणार नाही, म्हणून निझामशहाने डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी तलाव बांधून खापरी नळाने शहराला पाणीपुरवठा केला. किल्ल्यातील खंदक, हस्त बेहस्तसारख्या जलमहालांना खापरी नळाचे पाणी पुरवले जात असे. इमारती बांधण्यासाठी अहमद निझामशहाने जुन्नर येथून कारागीर आणले. आंध्र प्रदेशातून विणकर, भांडी तयार करणारे राजस्थानातील नागोर प्रांतातून, तर इराण, तुर्कस्थानातून तोफा तयार करण्यात पारंगत असलेले तज्ज्ञ आणले. ढाक्याच्या मलमलसारखी तलम वस्त्रे इथे विणली जात असत. जगातील सर्वात मोठी ५५ टन वजनाची मलिक-ए-मैदान तोफ नगरमध्येच तयार झाली. निझामशाहीत नगर हे देशातील मोठे शिक्षण केंद्रही होते, असे देशमुख यांनी सांगितले. फराहबाग, दमडी मशीद, सलाबतखान मकबरा अशा वास्तूंची, तसेच नगरची वीरांगना चांदबिबी, मलिक अंबर, भातोडीचा रणसंग्राम जिंकणारे शहाजी राजे यांच्याविषयीची माहिती देशमुख यांनी दिली. नगरचा भुईकोट किल्ला स्वतंत्र भारताचे तीर्थस्थळ व्हायला हवा, असे सांगून देशमुख म्हणाले, याच किल्ल्यात बंदिवासात असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी जगप्रसिद्ध "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ९९९ पानांचा ग्रंथ लिहिला. याच किल्ल्यातील वास्तव्यात नेहरू आणि अन्य ११ राष्ट्रीय नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर देश कसा चालवायचा, याचं नियोजन केलं. रेय ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, बालकवी यांच्यासारखे मोठे साहित्यिक नगरमध्ये वास्तव्यास होते, असे देशमुख यांनी सांगितले. हा इतिहास एेकताना विद्यार्थी भारावून गेले होते. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंना भेट देण्याची इच्छा अनेकांनी व्याख्यानानंतर व्यक्त केली.

लाडमोड टेकडीवर चक्रधर स्वामींची दिवाळी
ज्ञानेश्वरी,लीळाचरित्र डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे महत्त्वाचे ग्रंथ नगर जिल्ह्यातच निर्माण झाले. संत ज्ञानेश्वर आणि चक्रधर स्वामींना आत्मभानाची जाणीव गोदा-प्रवरेच्या काठीच झाली. लाडमोड टेकडीवरील वास्तव्यात चक्रधरांनी दिवाळी साजरी केली, अशी माहिती देशमुख यांनी या वेळी दिली.