आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंतींवरील चित्रांतून उलगडू लागला नगरचा इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एरवी निर्जीव भासणारी भिंत त्यावर चित्रं काढली की, कशी बोलू लागते, याचा प्रत्यय रविवारी ‘हेरिटेज वॉक’च्या निमित्ताने आला. नगरच्या सव्वापाचशे वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या वास्तूंची माहिती सावेडीतील जॉगिंग ट्रॅकची भिंत आता देऊ लागली आहे. 
‘स्वागत अहमदनगर’ या उपक्रमांतर्गत रविवारी प्रोफेसर कॉलनीजवळील क्रीडामहर्षी मेजर दिनुभाऊ कुलकर्णी जॉगिंग ट्रॅकच्या भिंतींवर चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेण्यात आली. प्रारंभी मागील पाच दशकांत नगरच्या क्रीडा वैभवात मोलाची भर घालणारे दिवंगत क्रीडा महर्षी दिनुभाऊ कुलकर्णी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आली. स्नेहालयाच्या पुनर्वसन प्रकल्पाची सुरूवात ज्या ‘जिओ डोम’पासून झाली, ती वास्तू रेखाटून हराळे यांनी आपल्या चित्रकौशल्याची झलक उपस्थितांना दाखवली. 

भुईकोट किल्ला, हश्त-बेहश्त महाल, बागरोजा, दर्गादायरा, दमडी मशीद, मांजरसुंभा गड, विशाल गणपती, अमृतेश्वर मंदिर, माळीवाडा वेस, शुक्लेश्वर मंदिर, ह्यूम चर्च, क्राईस्ट चर्च, अग्यारी, आनंदधाम, मेहेराबाद, पटवर्धन वाडा, रणगाडा संग्रहालय, शहाजीराजे व राजमाता जिजाऊ, चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक अशी अनेक रेखाचित्रे हराळे यांनी मागील तीन महिन्यांत जॉगिंग ट्रॅकच्या भिंतीवर रेखाटल्याने त्या बोलक्या झाल्या आहेत. या चित्रांविषयी या ‘हेरिटेज वॉक’मध्ये माहिती घेण्यात आली. 
 
डॉ. शशी धर्माधिकारी यांनी घेतली दखल
‘हेरिटेज वॉक’च्या या उपक्रमाची फ्रान्सस्थित डॉ. शशी धर्माधिकारी यांनी दखल घेऊन शुभेच्छा दिल्या.जॉगिंग ट्रॅकच्या भिंतींवर काढलेल्या चित्रांशेजारी त्या त्या स्थळाची माहिती असलेले फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉ. धर्माधिकारी यांनी दहा हजार रुपये दिल्याचे स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

दत्तक विधानामुळे नगरशी नाते जुळले
हेरिटेज वॉकनंतर बंगळुरू येथील मिली आणि प्रशांत दांपत्याला स्नेहांकुरमधील आरिन हे दुसरे बालक सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा आडम यांच्या हस्ते दत्तक देण्यात आले. आपले दुसरे मूलही स्नेहांकुरमधूनच दत्तक मिळाल्याने आपले कुटुंब परिपूर्ण झाल्याने नमूद करून मिली म्हणाल्या, या मुलांमुळे आमचे नगरशी कायमचे नाते जुळले आहे. नगरने आमची स्वप्नपूर्ती केली. अतुल महाडिक आणि युनूस देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
बातम्या आणखी आहेत...