आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक वारशाला पर्यटनाची जोड द्या, ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वैभवशाली इतिहास लाभलेलं नगर शहर युरोपात असतं, तर तेथील लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते. येथील ऐतिहासिक वास्तू सांभाळल्या पाहिजेत. पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवायला हवा. त्यासाठी पर्यटनाची जोड द्या, असे आवाहन पुण्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक िननाद बेडेकर यांनी केले. व्हर्सटाइल ग्रुप आणि आकाशवाणीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी बेडेकर नगरला आले होते. रावसाहेब पटवर्धन स्मारकात शनिवारी त्यांचे "वैभवशाली नगर' या विषयावर व्याख्यान झाले. रविवारी त्यांनी बागरोजा व भुईकोट किल्ल्याला भेट दिली. नगरच्या इतिहासाचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू त्यांनी कथन केले. हुसेन निझामशहा, सुलताना चांदबीबी, मलिक अंबर, शहाजी राजे अशा अनेक व्यक्तींविषयी त्यांनी सांगितले. महसूल गोळा करण्यासाठी धारा पद्धत निर्माण करणारा मलिक अंबर उत्तम शासक होता. मुघलापासून महाराष्ट्र वाचवताना शहाजी राजांच्या कर्तृत्वाला त्यानेच प्रथम संधी दिली. शहाजीराजांना त्यानेच गनिमी काव्यात प्रवीण केले. मलिक अंबर हे निझामशाहीचं वैभव होतं, असे बेडेकर म्हणाले.
तालिकोटची लढाई जिंकण्यात मोलाची भूमिका बजावणारी मुलूख मैदान तोफ नगरमध्येच तयार झाली. 55 टन वजनाची ही तोफ गाळण्याचे तंत्रज्ञान सोळाव्या शतकात नगरमध्ये अस्तित्वात होते. औरंगजेबालाही ही तोफ हवीहवीशी वाटली. ती हलवता आली नाही, तेव्हा त्याने आपले नाव त्यावर कोरले. ही तोफ नगरमध्ये तयार झाली, याचा अभिमान नगरकरांना वाटायला हवा, असे बेडेकर म्हणाले. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या नगरमध्ये इथल्या राजाने प्रचंड खंदक असलेला किल्ला बांधला, फराह बक्षसारखे जलमहाल तयार केले. शहा ताहिरसारखे मुत्सद्दी, साबाजी कुलकर्णींसारखे चतुर असे अनेक जण या परिसरात होऊन गेले. औरंगजेब तर अनेक वर्षे नगरला राहून देशाची सूत्रे हलवत होता. इथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. हे सगळं युरोपमध्ये घडलं असतं, तर तेथील लोक हा इतिहास डोक्यावर घेऊन नाचले असते. दुर्दैवाने आम्हाला आमचा खजिना कुठे आहे, हे माहीत नाही, अशी खंत बेडेकर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. प्रास्ताविक राहुल देशपांडे यांनी केले. डॉ. अंशू मुळे यांनी व्हर्सटाइल ग्रुपच्या उपक्रमांची माहिती दिली. व्याख्यानास महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर, आकाशवाणीचे मुज्जमिल पटेल उपस्थित होते. डॉ. महेश मुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री देशपांडे यांनी केले.
कसबा गणपतीला इनाम
इतिहास हे पुराव्याचे शास्त्र आहे, कल्पनेचे नाही. इतिहास अभ्यासण्यासाठी दस्तऐवज जमा करावे लागतात. हे कागद सहजासहजी मिळत नाहीत. पूर्वी दिवे नसायचे, झेरॉक्ससारख्या सुविधा नव्हत्या. अशा काळात आपल्या इतिहासकारांनी फर्मानांसारखी महत्त्वाची कागदपत्रे स्वत:च्या हस्ताक्षरात नकलून ठेवली. ही फर्माने म्हणजे राष्ट्रीय ठेवा आहेत, असे बेडेकर म्हणाले. नगरच्या मलिक अंबरने 1 जानेवारी 1619 रोजी फर्मान काढून सर्व वतनदारांना एकाच तारखेला इनाम दिले होते. त्यात पुण्यातील कसबा गणपतीला दिलेल्या इनामाचाही उल्लेख आहे, असे त्यांनी सांगितले.