आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवरेबाजारचा आदर्श राज्यातील सर्व गावांनी घ्यावा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - हिवरेबाजारने केलेला विकास ही आजच्या काळात मोठी क्रांती असून हा आदर्श राज्यातील सर्व गावांनी घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी केले. गावासाठी भरीव मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले.

डांगे यांनी शुक्रवारी हिवरेबाजारला भेट देऊन या गावाचे शिल्पकार पोपटराव पवार आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन, बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश शिंदे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंगारे, गटविकास अधिकारी निमसे आदी यावेळी उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी सर्वप्रथम शिक्षणापासून सुरूवात करून जलसंवर्धन, गावातील स्वच्छता यावर भर देत गावची प्रगती केली असे पवार यांनी सांगितले. सरपंचांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, प्रामाणिकपणा हवा. गावकर्‍यांचा विश्वास त्याने संपादन करणे जरुरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपालिकांनी येत्या पाच वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांच्या बैठकीत केली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, उपजिल्हाधिकारी अजय मोरे व जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रकांत खोसे यावेळी उपस्थित होते. डांगे म्हणाले, शहरात राहणार्‍या नागरिकांना शिक्षण, पाणी, आरोग्य, रस्त्याबरोबरच चांगल्या नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी नगरपालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय गरजा, नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आगामी पाच वर्षांतील कामांचे नियोजन नगरपालिका प्रशासनाने तयार करावे. नगरसेवकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. नगरपालिकांनी विकास आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एप्रिलअखेरपर्यंत वित्त आयोगाकडे पाठवावा.

खासदार वाकचौरे म्हणाले, नगरपालिका क्षेत्रात शुध्द पिण्याचे पाणी, रस्ते, भुयारी गटार योजना, घरकुल आदी कामांवर भर देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार म्हणाले, नगरपालिकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत र्मयादित असल्याने विविध योजनांखाली निधी मिळवण्यासाठी सर्व नगरपालिकांनी योग्य नियोजन करावे.

यावेळी बोलताना नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांनी विविध अडचणी मांडून विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी डांगे यांच्याकडे केली.

ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडे बनवा
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतनिहाय विकासकामांचे कृती आराखडे तयार करावेत, अशी सूचना डांगे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांच्या बैठकीत केली. ते म्हणाले, प्रत्येक गावाच्या गरजा व समस्या वेगवेगळ्या आहेत. रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी यासाठी किती निधी उपलब्ध आहे, अजून किती लागेल, देखभाल दुरुस्तीसाठी निधी किती लागणार याबाबत ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून निधीची मागणी करावी, असे डांगे यांनी सांगितले.