आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवरेझरे आठवडे बाजाराने दिला महिलांना रोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या नगर तालुक्यातील हिवरेझरे गावातील महिला बचतगटांनी एकत्र येऊन आठवडे बाजार सुरू केला. तीन आठवड्यांत बचतगटांना तब्बल लाखभर रुपयांची कमाई झाली. बाजाराच्या माध्यमातून हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याने बचतगटातील ७० ते ८० महिला स्वावलंबी झाल्या आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्राने हिवरेझरे गावात १८ महिला बचतगट स्थापन केले आहेत. साधन केंद्राच्या व्यवस्थापिका दीपाली बुरडे यांनी या बचतगटांना मार्गदर्शन केले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड व सहसमन्वयक सतीश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गावात आठवडे बाजार भरवण्याची कल्पना पुढे आली. बुरडे यांच्यासह साधन केंद्राच्या कार्यकारिणी सदस्य आरती रेघे यांनी सर्व बचतगटांना एकत्रित करून त्यांच्यासमोर आठवडे बाजाराची कल्पना मांडली.संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले.
गेल्या तीन आठवड्यांपासून आठवडे बाजार भरवला जात आहे. त्यात स्वयंभू, शांता-दुर्गा, संजीवनी, संत रोहिदास, सुवर्णज्योती, राजमाता, जिजामाता असे अनेक बचतगट सहभागी झाले. आजूबाजूच्या गावांतील शेतकरी व महिलाही बाजारात सहभागी झाल्या. त्यामुळे आठवडे बाजाराची ही संकल्पना यशस्वी ठरली. भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य, मिठाई यासारख्या अनेक वस्तू बचतगटांतील महिलांनी बाजारात विक्रीसाठी ठेवल्या. त्यातून प्रत्येक महिलेला चार ते पाच हजार रुपयांची कमाई झाली.

विशेष म्हणजे आठवडे बाजाराच्या माध्यमातून हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याने गावातील ७० ते ८० महिला स्वावलंबी झाल्या आहेत.

बाजारास चांगला प्रतिसाद
कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून २८ गावांमध्ये बचतगटांचे काम सुरू आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संकल्पनेतून हिवरेझरे येथे सुरू केलेल्या आठवडे बाजारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.''
दीपाली बुरडे, व्यवस्थापिका, साधन केंद्र.

स्थानिक रोजगार मिळाला
स्थानिक रोजगार नसल्याने गावातील बचत गटांसमोर अनेक अडचणी होत्या. मात्र, आता साधन केंद्राच्या माध्यमातून आठवडे बाजार सुरू झाल्याने रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. परिसरातील गावांमधून बाजारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबी झाल्या आहेत.''
संगीता काळे, अध्यक्ष, संजीवनी, बचतगट.