आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक विषमतेमुळेच समाजात अशांतता वाढतेय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजात अशांतता वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यात प्रामुख्याने आर्थिक विषमतेचा समावेश आहे. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे पोलिसबळही अपुरे आहे. सध्या असलेल्या पोलिसबळात वाढ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी शुक्रवारी केले.

होमगार्डच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा समादेशक व्ही. के. भोर्डे, यशवंत शिंदे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

या वेळी न्यायाधीश देबडवार म्हणाले, होमगार्डचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची व्याप्ती वाढली आहे. त्यांच्या काही व्यथा आहेत, पण आपण जे काम करतो ते देशासाठी करतो हे महत्त्वाचे आहे. समाजाला अडचणीच्या वेळी होमगार्ड जी मदत करतो, त्यातून आत्मिक समाधान मिळते. समाजात अशांतता वाढत असून त्याची कारणे अनेक आहेत. असमतोल विकास, लोकसंख्येची वाढ तसेच आर्थिक विषमता आदी त्याची कारणे आहेत. समाजातील अशांतता कमी करण्यासाठी पोलिसांबरोबरच होमगार्ड देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक होमगार्डने गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करून नियमित परेड करायला हवी. त्यामध्ये सातत्य व सहभाग देखील अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

भोर्डे म्हणाले, होमगार्डच्या मानधनात अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही. प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मानधनात तीनशे रुपयांची वाढ देण्याचे मान्य करूनही प्रत्यक्षात ते मिळत नाही. होमगार्डसाठी हक्काचे प्रशिक्षण केंद्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी विळद घाटात पाच एकर जागेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर आहे. बांधकाम खात्याकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. इतर राज्यात अठरा महिन्यांच्या करारावर होमगार्ड घेतले जातात ,परंतु महाराष्ट्रात तसे केले जात नाही. राज्यात पोलिसबळ अपुरे आहे, त्यामुळे पोलिसांचे टपालाचे काम होमगार्डकडे द्यायला हवे. याला गृहमंत्र्यांनी संमतीही दिली, पण काही युवक केवळ होमगार्डचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होमगार्डमध्ये दाखल होतात. ही संघटना प्रमाणपत्रापुरती र्मयादित नसून कार्य करणारी संघटना असल्याचे भोर्डे म्हणाले.