आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमगार्डसच्‍या उपोषणाची आतापर्यंत नाही घेतल्‍या गेली दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- होमगार्डस् संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (20 जानेवारी) सुरू करण्यात आलेल्या उपोषणाबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशी संघटनेचे उपोषण सुरूच होते. मागण्यांबाबत विचार न झाल्यास संघटनेतर्फे रविवारी (26 जानेवारी) जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गृहविभागातर्फे होणारी 62 हजार पोलिसांची भरती रद्द करून त्याऐवजी 56 हजार होमगार्डस्ला पोलिस सेवेत सामावून घ्यावे, होमगार्डस्ला 500 रुपये प्रतिदिन, 125 रुपये परेड भत्ता, 200 रुपये आहार भत्ता देण्यात यावा, होमगार्डस्ला बीपीएलधारक घोषित करून पिवळ्या शिधापत्रिका द्याव्यात, मोफत आरोग्य सेवा द्यावी, होमगार्डच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, होमगार्डस् सेवानिवृत्त झाल्यास किंवा मृत्युमुखी पडल्यास शासनाकडून त्याला पाच लाखांची मदत देण्यात यावी, ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्य काढून ‘कायम सेवा’ ब्रीदवाक्य करावे, यासह अन्य मागण्यांसाठी होमगार्ड संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय माळी यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार अनिल राठोड यांनी आंदोलकांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता. उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस होता. दरम्यान, उपोषणामुळे बुधवारी माळी यांची प्रकृती खालावली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी माळी यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. उपोषणात विशाल काकडे, नीलेश गागरे, शैला आडोळे, सुषमा गटकर, नवनाथ कोलते, अशोक डोरके सहभागी झाले आहेत.शासन आमच्या मागण्यांबाबत जोपर्यंत सकारात्मक विचार करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे. विचार न केल्यास 26 जानेवारीला महाराष्ट्रभर होमगार्डस् जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष माळी यांनी दिला आहे.