आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीस्थळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे काम असो की, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असो किंवा मंत्रिपद असो प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडणारे आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तीस्थळ आहे, असे गौरवोद्गार आर. आर. पाटील यांनी सोमवारी काढले.

येथील तुळशीदास लॉनमध्ये पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस अध्यक्षस्थानी होते. मंत्री पाटील म्हणाले, आमदार कसा असावा हे आपण पाचपुतेंकडून शिकलो. पक्ष मोठा करण्याचे काम त्यांनी केले. आगामी लोकसभेचा संदर्भ देत त्यांनी नरेंद्र मोदी व राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत टीका केली. ते म्हणाले, अमुक एक व्यक्ती देशाचा कायापालट करेन म्हणतो. त्यांच्याकडे काय जादूची कांडी आहे का? नेहरू, पटेल, गांधी आदींनी जे विकासकार्य केले त्यास कित्येक वष्रे लागले. अन् आताचे हे भाजपचे टिकूजीराव काय दिवे पाजळणार आहेत? राज्याची विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. असे म्हणणार्‍यांना महाराष्ट्र समजला आहे का? अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी कृषिमंत्री शरद पवार यांनी अन्नधान्याबाबत राबवलेल्या धोरणामुळेच शक्य झाले आहे. सत्काराला उत्तर देताना पाचपुते म्हणाले, कार्यकर्ते हेच माझी खरी प्रेरणा व शक्ती आहे. तालुक्याच्या विकासासाठी आपण व्हिजन तयार केले आहे. यावेळी आमदार अरुण जगताप, दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे, प्रतिभा पाचपुते, ‘परिक्रमा’चे सचिव विक्रमसिंह पाचपुते, ‘साईकृपा’चे उपाध्यक्ष राजकुमार ढमढेरे आदी उपस्थित होते.

शहाण्या पोरालाच खरेदीला पाठवतात..
एखाद्या कुटुंबात अनेक मुले असली तरी महत्त्वाच्या खरेदीसाठी शहाण्या पोरालाच पालक पाठवतात. देश चालवण्यासाठी ज्यांना पाठवायचे आहे. त्यात कळते नेते-उमेदवार असतील. स्वयंपाक चांगला करायचा का बिघडवायचा हे आचारी ठरवतो. नेत्यांनीही आपसात स्वयंपाक व भाजी कशी व कोणी बनवायची हे ठरवून घ्यायला हवे. पुढारी चांगले राहिले, तर तालुके चांगले राहतात.’’ आर. आर. पाटील, गृहमंत्री.

उमेदवारीबाबत बोलणार नाही
सध्या खासदारकीच्या निवडणुकीच्या चर्चा सर्व बाजूंनी सुरू आहे. त्याबाबत मी काहीच बोलणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील. तो आम्हा सर्वांना मान्य असेल. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहणार आहे.’’ बबनराव पाचपुते, आमदार.

पाचपुतेंना उमेदवारी द्या
पालकमंत्री असताना बबनराव पाचपुतेंनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना व निधी आणल्या. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जागा मिळवायची असेल, तर राष्ट्रवादीने पाचपुतेंनाच उमेदवारी द्यावी. तसे झाले, तर यश निश्चित मिळेल.’’ अरुण जगताप, आमदार.