आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका खरमाळे यांच्या बंगल्यात भरदुपारी चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुलमोहोर रोड परिसरातील रामकृष्ण कॉलनीत राहणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका संगीता खरमाळे यांचे घर चोरट्याने मंगळवारी दुपारी फोडले. विशेष म्हणजे घरातील दागिने व रोकड चोरून नेताना त्याला खरमाळे यांनी पाहिले. पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून धूम ठोकणार्‍या या चोराने रस्त्यातील एका युवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याची दुचाकीही लांबवली. जाताना त्याने पिस्तूल फेकून दिले.

नगरसेविका खरमाळे कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजता त्या आल्या तेव्हा त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना बोलावले. त्यावेळी घरातच असलेला चोर पाठीमागच्या बाजूने पळाला. जाताना त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत अभिषेक नावाच्या युवकाला अडवले. अभिषेकची अँक्टिव्हा हिसकावून त्याने धूम ठोकली. जाताना पिस्तूल मात्र रस्त्यातच फेकून दिले.

परिसरातील नागरिकांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वळवी फौजफाट्यासह घटनास्थळी आले. चोरट्याने पिस्तूल फेकताना अभिषेकने पाहिले होते. त्याने ते वळवी यांच्या ताब्यात दिले. त्याची दुचाकी नवीनच असल्यामुळे तिच्यावर क्रमांक नव्हता. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी घरफोडी,भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.