आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उधळलेला घाेडा मंत्र्याच्या गाडीवर धडकला, उपचाराअभावी मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- ट्रकच्या हॉर्नच्या आवाजाने उधळलेला घोडा लग्न समारंभासाठी आलेल्या एका मंत्र्यांच्या गाडीवर जाऊन धडकल्याने गाडीचे मोठे नुकसान झालेच; परंतु घोडाही गंभीर जखमी झाला. सरकारी गाडीचे नुकसान झाल्याने पोलिसांनी तातडीने घोड्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला. परंतु, पोलिस केस झाल्याने डॉक्टरांनी घोड्यावर उपचार करण्यास तत्परता दाखवली नाही. दुसऱ्या दिवशी या घोड्यावर उपचाराचा प्रयत्न झाला. मात्र ताेपर्यंत गंभीर जखमी घोड्याने दम तोडला. शवविच्छेदनासाठी बुधवारी सायंकाळपर्यंत पोलिसांचे पत्र मिळाले नसल्याने या घोड्याचा दफनविधीही लांबला.   


मंगळवारी येथील नगर-मनमाड रस्त्यावरील एका मंगल कार्यालयातील विवाह साेहळ्यास सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांची गाडी रस्त्यावर उभी होती. याच वेळी लॉन्समधून दुसरा नवरदेव मिरवण्यासाठी घोड्यावरून जात हाेता. दरम्यान, एका ट्रकच्या हाॅर्नमुळे हा घाेडा उधळून शिंदेंच्या गाडीवर जाऊन धडकला. यामुळे गाडीचे नुकसान झाले,  घोडाही गंभीर जखमी झाला. सरकारी गाडीचे नुकसान झाल्याने घोडामालकावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. 


घोड्यावर उपचारासाठी तत्परता मात्र कुणीही दाखवली नाही. परिस्थितीने गरीब असलेला मालक घोड्यास घेऊन उपचारासाठी काही वेळाने डाॅक्टरकडे गेला, मात्र पोलिस केस असल्याने डाॅक्टरांनी वेळकाढूपणा केला. बुधवारी सकाळी डाॅक्टरांनी घोड्यावर उपचार केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने ताेपर्यंत घोड्याने प्राण सोडले. केस दाखल झाल्याने घाेड्याचे शवविच्छेदन करणे गरजेचे हाेते, त्यामुळे त्याचा दफनविधीही करता अाला नाही. घाेडेमालकाने डाॅक्टरांना शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांचे पत्र असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. 


पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांनी डाॅक्टरांकडे बोट दाखवले. एक तर अगोदर उपचारासाठी तू-तू-मैं-मैंपायी घोड्याचा अंत झाला. मात्र, शेवटच्या विधीला सतराशे विघ्ने आल्याने घोडेमालकास कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. शिर्डी येथील अॅड. अनिल शेजवळ यांनी राहाता पोलिस ठाण्याचे गायमुखे या पोलिस कर्मचाऱ्याशी संपर्क साधून किमान त्या घोड्याचा दफनविधी करण्यासाठी शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांचे पत्र द्यावे, अशी विनंती केली. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत पोलिसांचे पत्र न मिळाल्याने घोडा शेवटच्या विधीच्या प्रतीक्षेत पडून आहे.

बातम्या आणखी आहेत...