आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पार्किंगखाऊ' रुग्णालयांचा प्रश्न पुन्हा आला ऐरणीवर, खंडपीठात आज सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील पार्किखाऊ रुग्णालयांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी अशा रुग्णालयांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (१४ जून) सुनावणी होणार आहे. न्यायालयाने याप्रकरणी शपथपत्र सादर करण्याचे आदेश यापूर्वीच मनपा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार शपथपत्र सादर केले नाही, तर प्रशासन बेकायदा रुग्णालय चालकांंची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिका हद्दीत तब्बल ३१२ क्लिनिक १३९ रुग्णालये आहेत. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम १९४९ नुसार क्लिनिक रुग्णालयांची नोंदणी केली आहे. मात्र, ही नोंदणी करताना अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी मनपाच्या नगररचना विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. शिवाय बांधकाम परवाना घेताना रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे केलेले नाही. पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनेकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. मनपाने अशा १२० रुग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी ५२ रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे अंतिम आदेशही दिले होते. परंतु तत्कालिन आयुक्त विजय कुलकर्णी यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, काही रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम काढून घेतले होते. परंतु अजूनही काहींनी पार्किंगच्या जागेत केलेले अनधिकृत बांधकाम तसेच ठेवले आहे.प्रशासन यासंदर्भात कोणतीही कारवाई करत नसल्याने शेख यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाने शेख यांच्या याचिकेवर सुनावणी घेत मनपा प्रशासनाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु सहा महिने उलटले, तरी प्रशासनाने शपथपत्र सादर केलेले नाही, तसेच त्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही केली नाही. न्यायालयाने सुनावणीसाठी १४ जून ही तारीख दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले. प्रशासनाने शहरातील तब्बल दीडशे रूग्णालयांना नव्याने नोटिसा बजावल्या आहेत. परवाने रद्द का करू नयेत, असा जाब प्रशासनाने या रूग्णालय चालकांना विचारला आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत प्रशासनाने शपथपत्र सादर केले नाही, तर मनपा प्रशासनासह रूग्णालय चालकांची डोकेदुखी वाढणार आहे.
कारवाई थांबवण्यासाठी दबाव
उपायुक्तअजय चारठाणकर यांनी पार्किंग नसलेल्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारताच वैद्यकीय व्यावसायिकांनी दबावतंत्र सुरू केले होते. कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले. चारठाणकर यांनी काही रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे अंतिम आदेशही दिले होते, परंतु पुढील कार्यवाही झाली नाही.
प्रशासनाची रुग्णालयांना साथ
शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सर्व नियम धाब्यावर ठेवत रुग्णालये सुरू केली आहेत. यासंदर्भात नगर विकास विभागाकडेदेखील तक्रार करण्यात आली होती. परंतु मनपा प्रशासन या रूग्णालयांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. त्यामुळेच प्रशासन रूग्णालयांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. शाकीर शेख, याचिकाकर्ते.