नगर - फेब्रुवारी२०१५ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनीने कॉपी केल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर पुढील पाच परीक्षांसाठी प्रतिबंध घालण्यात यावेत, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहीद विठ्ठल भालसिंग ज्युनिअर कॉलेज (सध्याचे नाव जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेज) या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने लेखी परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याची तक्रार शिक्षण मंडळाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी गोपनीय चौकशी करण्यात आली. त्यानुसार मंडळाने पुढील कारवाईसाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. गोपनीय चौकशीत शर्वरी नंदराम गोरे (बैठक क्रमांक ०४६८८७) या विद्यार्थिनीने परीक्षेत कॉपी साहित्य जवळ बाळगल्याचे, तसेच शिक्षकांच्या साहाय्याने कॉपी केल्याचे सिद्ध झाले. तिचे वडील नंदराम गोरे आणि उपप्राचार्य रझिया इनामदार यांच्यामार्फत परीक्षा यंत्रणेवर दबाव आणून पेपर सोडवल्याचेही स्पष्ट होत आहे.
याप्रकरणी गोरे हिची २०१५ एचएससी परीक्षेची संपूर्ण संपादणूक रद्द करून तिला पुढील पाच परीक्षांसाठी (ऑक्टोबर २०१७ पर्यंत) परीक्षेला बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. महाविद्यालयात समक्ष जाऊन विद्यार्थिनीचे परीक्षेचे मूळ गुणपत्रक, प्रमाणपत्र इन्स्पायर प्रमाणपत्र ताब्यात घेऊन पाठवावे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या अभिलेखात विद्यार्थिनीच्या बैठक क्रमांकासमोर परीक्षेची संपादणूक रद्द पुढील पाच परीक्षेसाठी प्रतिबंध असा शेरा द्यावा, असे आदेशात म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील अकरा जणांची खातेनिहाय चौकशी करून कारवाईचा अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचेही आदेशही मंडळाने दिले आहेत. त्यात दादासाहेब बांगर, सोपान तांदळे, अशोक साळवे, नंदराम गोरे, रझिया इनामदार, मृणालिनी गोरे, महेश राहिंज, उज्ज्वला कराळे, सुरेखा बेल्हेकर, अभय म्हस्के, बसुमती भेळे, आंबाडे, कांगुणे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.