आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या अकराव्या वर्षी ओंकारने गाठली व्याख्यानांची शंभरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिकणा-या ओंकार बाबासाहेब व्यवहारे याने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी व्याख्यानांची शंभरी गाठली आहे. प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर ओंकार महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार समाजासमोर मांडतो आहे. कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणा-या आष्टी (जि. बीड) तालुक्यातील अंभोरा हे ओंकारचे गाव. सध्या तो नगरच्या फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत आहे. त्याचे वडील बाबासाहेब व्यवहारे हे एसटीच्या तारकपूर आगारात नोकरीला आहेत.
ओंकारला वयाच्या सातव्या वर्षापासून वाचनाची आवड लागली. वाचनामुळे त्याचे भाषेवरील प्रभृत्व पक्के होत गेले. लोणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत असताना तो शिवजयंती व अन्य राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेऊन भाषणे करायचा. शिक्षक, ग्रामस्थ त्याचे कौतूक करायचे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. नंतर त्याने परजिल्ह्यांत व्याख्याने देण्यास सुरुवात केली. अभ्यास, प्रचंड आत्मविश्वास, बाणेदार आवाज, भाषण सादरीकरणाचे कौशल्य यामुळे त्याचे वक्तृत्व आणखी खुलत गेले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा समाज, स्वामी विवेकानंद, माझी आई, स्त्री भ्रूणहत्या, छत्रपती संभाजी महाराज या विषयांवर ओंकार महाराष्ट्रभर व्याख्याने देत असते.मराठवाड्यातील बीड, पाटोदा, औरंगाबाद, जालना, परळी, पुणे आदी जिल्ह्यांत त्याने व्याख्याने दिली आहे. व्यासापीठावर गेल्यावर काय बोलायचे हे न आठवून अनेकांची तारांबळ उडते, पण वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लाखोंच्या गर्दीसमोर ओंकारने व्याख्याने दिली आहेत. त्याच्या शिवरायांवरील व्याख्यानांनी आता शंभरी गाठली आहे.