आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband And Mother In Law Gets 10 Years Imprisonment

नगर तालुक्यातील पती व सासूला 10 वर्षे सक्तमजुरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या पती व सासूला जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे सप्टेंबर 2012 मध्ये ही घटना घडली होती.

संतोष बबन शेलार (27) व कौसल्याबाई बबन शेलार (52) अशी आरोपींची नावे आहेत. राणी ऊर्फ विद्या हिचे संतोषशी मे 2011 मध्ये लग्न झाले. सहा महिने सासरच्या लोकांनी राणीला चांगली वागणूक दिली. मात्र, नंतर हुंड्यापोटी राहिलेले 30 हजार व तिच्या नावावरील फिक्स्ड डिपॉझिटमधून वडिलांना मिळालेले 80 हजार रुपये घेऊन येण्याचा लकडा लावण्यात आला. या मागणीसाठी संतोष व सासू तिला मारहाण व शिवीगाळ करू लागले. छळाला कंटाळून अखेर तिने 15 सप्टेंबर 2012 रोजी फाशी घेतली. राणीचा भाऊ प्रशांत अर्जुन मत्रे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संतोष व कौसल्याबाईविरुद्ध फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक टी. बी. कोल्हे यांनी तपास केला.
फिर्यादी प्रशांत मत्रे, आई शालन, मामा सुरेश कानगुडे व पोलिस नाईक संजय शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आत्महत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी धरून आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हुंडाबळीसह इतर कलमान्वये आरोपींना शिक्षा व दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील सुरेश लगड यांनी बाजू मांडली.