आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवत जाळून मारणाऱ्या पतीला संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळासाहेब गणपत जाधव (वय ४० वर्षे, वडगावपान ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. खटल्यात चौदा वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात १५ मार्च २०१३ रोजी आरोपी बाळासाहेब जाधव याने पत्नी पुष्पा (वय ३५) हिच्या अंगावर घरासमोर अंगणामध्ये रॉकेल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या पुष्पा हिच्यावर लोणीच्या प्रवरा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुष्पा हिने मृत्युपूर्व जबाबात पतीने आपल्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे म्हटले होते. तालुका पोलिस ठाण्यात तिच्या मृत्युनंतर आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या प्रकरणाचा तपास करत सकृतदर्शनी पुरावे, साक्षीदार गोळा करून संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.न्यायाधीश एम. एम. भगत यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारच्यावतीने अॅड. बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले. कोल्हे यांनी खून प्रकरणातील महत्त्वाचे अकरा साक्षीदार न्यायालयात तपासले. आरोपीने खून केल्याचे त्यांनी साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिस हवालदार काशिनाथ गोविंद पालवे यांच्यासह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जांबेसर मसउद्दीन फारुकी मृत पुष्पा आणि आरोपीची चौदा वर्षांची मुलगी प्रणाली हिची साक्ष महत्त्वाची ठरली.

या वेळी न्यायालयासमोर प्रणाली हिने वडिलांनी आईच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची साक्ष दिली. साक्षीपुरावे आणि मुलगी प्रणाली हिच्या साक्षीवर न्यायाधीशांनी विश्वास दाखवत आरोपीला जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंडाची आणि दंड भरल्यास तीन महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

वाढवले साक्षीदारांचे मनोबल
न्यायालयातखटला सुरू असताना साक्षीदार फुटू नयेत, त्यांनी घडलेल्या घटनेसंबधी योग्य साक्ष द्यावी यासाठी सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांच्यासह पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अन्सार शेख, पोलिस कर्मचारी शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. चौदा वर्षांची प्रणाली हिच्या साक्षीमुळे पिता थेट जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचला.