आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- आयसीआयसीआय बँकेत सरकारच्या विविध योजनांचे कोट्यवधी रुपये जमा होतात. तथापि, ही बँक सर्वसामान्यांना मदत करत नाही, असे ताशेरे खासदार दिलीप गांधी व भाऊसाहेब वाकचौरे यांनी मारले. याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करून कारवाईसाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची सभा सोमवारी जिल्हा नियोजन भवनात झाली. यावेळी गांधी बोलत होते. खासदार वाकचौरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अंबादास गारूडकर आदी सभेस उपस्थित होते.
आयसीआयसीआय बँकेच्या कारभाराबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त करून बँक सामान्यांना सहकार्य करीत नसल्याबद्दल ताशेरे ओढले. खासदार गांधी यांनी बँकेच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनांतून कोट्यवधी रुपयांचे अनुदान या बँकेत जमा होते. ही व्यापारी बँक शेतकरी व इतरांना मदत करण्याची भाषा करते. तथापि, बँकेने लावलेले सुविधेचे फलक केवळ जाहिरातीपुरतेच आहेत. बँकेकडून सामान्य जनतेला सहकार्य केले जात नाही. लाभार्थींना मदत होत नसल्याने बँकेवर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्यात येईल, तसेच पत्र पाठवून कारवाईसाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल.
खासदार वाकचौरे यांनीही बँकेच्या अधिकार्यांवर ताशेरे ओढत बँकेतील कारकूनही स्वत:ला राजे समजतात, अशी टीका केली. यावर बँकेच्या अधिकार्यांनी मौन पाळले.
बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार्या कामांवर योजनेच्या माहितीचा फलक लावला जात नाही. फलक नसेल, तर पुढील निधी देण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले. यावर गारूडकर यांनी फलक लावल्यास ते चोरी जातात, असे सोयीस्कर उत्तर दिले. ठरावाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नाही. याप्रकरणी केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्या नावे ठराव करावा. त्यात जिल्हास्तरावरील बैठकांची विभागीय व राज्यस्तरीय दक्षता समितीच्या सभांत कार्यवाही होत नाही, असे स्पष्ट नमूद करण्याची सूचना गांधी यांनी केली.
रस्त्यांच्या कामाच्या मागणीबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना खासदार वाकचौरे यांनी विचारले असता ते निरुत्तर झाले. याबद्दल गांधी यांनी संताप व्यक्त करून अधिकार्यांच्या पातळीवर कार्यवाही होत नसेल, तर आम्ही केंद्रातून निधी कसा आणायचा असा प्रश्न उपस्थित केला. तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
भूमिगत वीजवाहिन्या मनपा परवानगीच्या प्रतीक्षेत
नगर शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेकडून हिरवा कंदील अद्यापि मिळालेला नाही. या योजनेसाठी दोन वर्षांपूर्वी निधी उपलब्ध झाला. मनपाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने काम रखडले आहे. निधी परत जाण्याची शक्यता आहे. मनपाने तातडीने एनओसी द्यावी, अशा सूचना खासदार गांधी यांनी केली. शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी मंगळवारी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पाथर्डीतील रोहयो कामात अनियमितता
रोजगार हमी योजनेंतर्गत पाथर्डीत झालेल्या रोपवाटिकांच्या कामात अनियमितता झाली आहे. मस्टरयादी ऑनलाइन होण्यापूर्वी झालेल्या कामांची मजुरी अदा झालेली नाही, असे अशोक चोरमले यांनी सभेत सांगितले. यावर खासदार गांधी यांनी तातडीने मजुरी अदा करावी, असे सांगितले. रोहयोचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले.
आयएएस अधिकारी काम करत नाहीत..
राज्यातील अधिकारी, तसेच केंद्राचे आयएएस अधिकारी काम करत नाहीत, असा माझा दावा आहे. सचिव पदावर बसलेले अधिकारीही आयएएस आहेत. माझा दावा मी सिद्ध करू शकतो, अशा शब्दांत खासदार वाकचौरे यांनी अधिकार्यांना सुनावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.