नगर - पाणी हा शेतकर्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. साकळाई योजना ही नगर व श्रीगोंदे तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य तरुणांनी ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी, असा सणसणीत टोला माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता लावला.
गुंडेगाव (ता. नगर) येथे झालेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा व सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल उपायुक्त नानासाहेब बोठे होते.
विखे म्हणाले, साकळाई पाणी योजना दुष्काळी गावांना वरदान ठरणार आहे, पण सत्तेतीलच मंडळी शुक्राचार्य बनून आडवी येत आहेत. राजकीय माणसे स्वत:च्या फायद्यासाठी शुक्राचार्य बनत असतील, तर सर्वसामान्यांनी दाद कुणाकडे मागायची? त्यामुळेच सर्वसामान्यांचा आता पुढार्यावर विश्वास राहिलेला नाही. या शुक्राचार्यांना शोधून धडा शिकवण्याचे काम यापुढील काळात करावे लागणार आहे. त्याकामी तरुणांनी पुढे आले पाहिजे.
कुकडीच्या पाण्यासाठीही श्रीगोंदे, कर्जतमध्ये आंदोलने करावी लागतात, तीही या शुक्राचार्यांमुळेच. साकळाई योजना असती, तर नगर साखर कारखान्याची ही अवस्था झाली नसती, असे विखे म्हणाले.
देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा फक्त ठरावीक लोकांनाच होतो आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. गरजेपोटी कमी किमतीत शेतकरी धान्य विकतो. गोदाम शेतकर्यांसाठी, पण त्याचा लाभ मात्र दुसरेच घेत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकर्यालाच ग्राहक बनावे लागत आहे, असे ते म्हणाले.
नेतेमंडळी राजकीय हेतूने कारखाने काढत आहेत. पूर्वी कारखान्यांमागे समाजकारण होते. ते आता दिसत नाही. सध्याचे युग स्पध्रेचे आहे. या युगात बुद्धीला किंमत आहे आणि ज्ञानालाच ओळख आहे. शिक्षण आणि बुद्धीची सांगड घातली पाहिजे. शिक्षणातून स्वत:ची ओळख स्वत:च निर्माण केली पाहिजे. शिक्षण हा ज्ञानाचा झरा आहे, मृगजळ नाही, असे विखे यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कुकडी साक्षर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप, बन्सीभाऊ म्हस्के, भगवानराव बेरड, किसनराव लोटके, संजय गिरवले, संदीप जाधव, वाल्मीक नागवडे, दत्ता नारळे, संजय कोतकर, रघुनाथ हराळ आदी उपस्थित होते. नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेकांनी मुळे यांचा सत्कार केला.
मीडियाने विचारांची दिशा बदलली
मीडियाने, वृत्तपत्रांनी गेल्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या विचारांची दिशाच बदलून टाकली आहे. जाहिरातींमुळे आवडी-निवडी बदलल्या आहेत. त्यातूनच भांडवलशाही अर्थव्यवस्थेने प्रवेश केला. माध्यमांचा वापर करमणुकीपुरताच केला गेला पाहिजे. योग्य ते घेऊन अनावश्यक सोडून दिले पाहिजे, असे बाळासाहेब विखे यांनी या वेळी सांगितले.