आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरे यांना पुरस्कार दिल्यास राज्यात विचारांचा वणवा पेटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संभाजी ब्रिगेडच्या वतीने माउली सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवजागर परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड.)
नगर-बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यास राज्यात विचारांचा वणवा पेटेल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आयोजित अधिवेशन शिवसन्मान जागर परिषदेत प्रमुख वक्त्यांनी दिला. आमदार जितेंद्र आव्हाड, इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी सरकारवर टीका करत पुरंदरे यांना पुरस्कार देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.
संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीतर्फे सोमवारी माउली सभागृहात आयोजित अधिवेशन जागर परिषदेत पुरंदरे राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. आमदार आव्हाड म्हणाले, पुरंदरे यांना पुरस्कार द्यायचाच असेल, तर सरकारने तो नाटककार म्हणून द्यावा. इतिहासकार म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करू नये.

महात्मा गांधींवर गोळ्या झाडणा-या नथुराम गोडसेचा वाढदिवस साजरा होऊ लागला, तेव्हाच बदनामीकारक खोटा इतिहास लिहिणा-या पुरंदरे यांना पुरस्कार निश्चित झाला. शिवाजी महाराजांना सातशे एकर जमीन देणा-या याकूबबाबांची माहितीच आम्हाला नाही. याला कारण आम्हाला खरा इतिहास शिकताच आला नाही. वारंवार निदर्शनास आणून देऊनही सरकारने पुरंदरे यांना पुरस्कार दिल्यास मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला धग लागेल याचा वणवा राज्यात पेटेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला.

कोकाटे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वीच शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यां पर्यंत नेत त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. पुरंदरे यांनी मात्र शिवरायांची बदनामी करणारे लिखाण केले. महाराज मुस्लिम विरोधी असल्याचे चित्र त्यांनी रंगवले. त्यांना पुरस्कार प्रदान केल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावू, असा इशारा कोकाटे यांनी यावेळी दिला.


ऑगस्टमध्ये शिर्डीत परिषद
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी राज्यभर शिवजागर परिषदा घेण्यात येत असल्याचे ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी सांगितले. शिर्डी येथे ऑगस्टमध्ये परिषद होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...