आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला जीवितहानीची प्रतीक्षा, शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासन मागील अनेक वर्षांपासून शहरातील धोकादायक इमारतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पावसामुळे धोकादायक इमारत कोसळून काहींना आपला जीवही गमवावा लागला. असे असतानाही मनपा प्रशासन संबंधित इमारत मालकांना दरवर्षी केवळ नोटिसा बजावण्याची औपचारिकता करत आहे. या इमारती अद्याप तशाच उभ्या असल्याने या पावसाळ्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपा प्रशासनाने वेळीच जागे होऊन या इमारती उतरवून घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या इतर उपाययोजनादेखील अद्याप कागदावरच आहेत.
मध्यवर्ती शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेकडील नोंदीनुसार शहरात ४६ धोकादायक इमारती आहेत. प्रत्यक्षात हा आकडा दीडशेच्या पुढे अाहे. या इमारती कोसळल्यास अनेकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. धोकादायक इमारतींचे अनेक मालक इतर शहरात वास्तव्याला आहेत. मनपाने संबंधितांना नोटिसा पाठवल्या, परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. इमारत उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची असल्याचे मनपा प्रशासन सांगते. इमारत मालकांनी शुल्क भरल्यानंतरच इमारत पाडली जाते. परंतु इमारत पाडून घेण्यासाठी एकही इमारत मालक पुढे येत नाही. मनपा प्रशासनही दरवर्षी केवळ नोटिसा बजावण्याची अौपचारिकता पूर्ण करते.

मागील अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे. दोन वर्षांपूर्वी नेहरू मार्केटजवळील एक धोकादायक इमारत कोसळून एका वृध्दाला आपला जीव गमवावा लागला होता. यंदाही पावसामुळे अशी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही मनपा प्रशासन धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष करत आहे. धोकादायक इमारतींसह प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या इतर उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केले आहे. या उपाययोजनांसाठी दरवर्षी आपत्कालीन आराखडा तयार केला जातो. नालेसफाई, धोकादायक इमारती, तुंबलेल्या गटारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच सक्षम अारोग्य यंत्रणेबाबतच्या उपाययोजना आपत्कालीन आराखड्याद्वारे केल्या जातात. यावर्षीचा आपत्कालीन आराखडा अद्याप कागदावरच आहे. पावसाला सुरुवात झाली, तरी नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नगरकर करत आहे.

आपत्कालीन आराखडा (प्रमुख उपाययोजना)
नदीपात्रातील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावणे.
महापािलकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे.
धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करणे.
साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा.
घरांमध्ये पाणी घुसल्यास ‘सक्शन’ युनिट तयार ठेवणे.
शहरातील स्वयंसेवी संस्था संघटनांची यादी तयार करणे.
नागरिकांच्या जागृतीसाठी आपत्कालीन शिबिर घेणे.
सीना नदीची पूररेषा निश्चित करणे.

आदेशाला केराची टोपली
आपत्कालीन आराखडा तयार करून पाच दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. परंतु या आदेशाला कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. पावसाला सुरुवात झालेली असतानाही पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारे एकही काम पूर्ण झालेले नाही. त्याचा फटका नागरिकांना पहिल्याच पावसात बसला. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसात मुकुंदनगर भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पुढील काळात मुसळधार पाऊस झाला, तर या नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शहराच्या विविध भागात ड्रेनेज, रस्ते, गटार आदी कामांसाठी खोदकाम झालेले आहे. पावसाचे पाणी या अपूर्ण कामांमध्ये साचणार असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
२२ एकूण ओढे-नाले
१०० नोंदनसलेल्या इमारती
४६ धोकादायक इमारती
बातम्या आणखी आहेत...