आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ilegal Activites Runing Under The Police Shadow In Nagar

नगरमध्‍ये पोलिसांच्या आशीर्वादाने सगळे अवैध धंदे तेजीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मटका, जुगार, अँपेरिक्षांची बेकायदा वाहतूक, सोरट, वाळूची चोरटी वाहतूक, पारगमन व कॅन्टोन्मेंट नाक्यावरील लूट आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक गुन्हे शाखा वसुलीच्या कामात गर्क आहे.

शहर व उपनगरात धूम स्टाइलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, जबरी चोर्‍या व घरफोड्या हे गुन्हे नित्याचे झाले आहेत. शहरात मटका जोरात सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. खुद्द पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानासमोरच्या टपरीवर मटका सुरू आहे. स्थानिक पोलिस व एलसीबीशी संगनमत करून खुलेआम मटका चालतो. शहरात सुमारे अडीचशे टपर्‍यांवर मटका सुरू आहे.

शहर उपअधीक्षक श्याम घुगे यांनी महिनाभरापूर्वी कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून मटका अड्डे उघडकीस आणले. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने या टपर्‍या पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत.

जुगाराचे मोठे दहा अड्डे शहरात आहेत. ठरावीक रक्कम दरमहा पोहोच केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहराच्या मध्यवस्तीत राजरोसपणे जुगार सुरू असताना पोलिस दुर्लक्ष करतात. एलसीबी पथकाने या अड्डय़ांवर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही. भिंगारमध्येही खुलेआम जुगार सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला जुगाराच्या भांडणातून बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, त्याची साधी नोंद करण्याचे धाडसही संबंधित कर्मचार्‍याला दाखवता आले नाही.

वाहतुकीचा बोजवारा उडवत शहरात धावणार्‍या बेकायदा अँपेरिक्षांवर वाहतूक शाखेकडून केवळ कारवाईचा फार्स केला जातो. दंड भरून या अँपे पुन्हा रस्त्यावर धावत आहेत. आरटीओ व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त कारवाईची प्रतीक्षा पूर्ण होण्यास तयार नाही. कारवाई होत नसल्याने पांढर्‍या रंगाच्या अँपेंचा व्यावसायिक वापर सुरू झाला आहे.

महापालिकेचा पारगमन नाका व भिंगार छावणी मंडळाच्या प्रवेश कर नाक्यावर ट्रकचालकांची लूट होत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले, परंतु ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध असलेले पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत.

विविध कारणांवरून पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, कर्मचारी यांची चौकशी आतापर्यंत झाली आहे. मात्र, नंतर कोणावरही कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही.

जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे सांगण्यात येते. तथापि, अधिकारी व कर्मचारी अवैध धंद्याला देत असलेल्या संरक्षणामुळे त्यांच्या या प्रतिमेला तडा जात आहे. यासंदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

शहरात मटक्याच्या 250 टपर्‍या सुरू आहेत. त्यांच्याकडून दरमहा 5 हजार रुपये प्रतिटपरी घेतले जातात. जुगाराचे मोठे दहा अड्डे सुरू असून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपये दरमहा घेतले जातात. अवैध वाळूच्या अडीचशे ते तीनशे गाड्या शहरातून दररोज जातात. एका गाडीमागे 1 हजार रुपये मोजावे लागतात. अवैध अँपेरिक्षाचालकांकडून दरमहा ठरावीक रक्कम घेतली जाते. पारगमन नाका व छावणी मंडळाच्या नाक्यांकडून येणारे हप्ते वेगळे आहेत.

अवैध धंद्यांना थारा देणार नाही..
अवैध धंद्यांवर गेल्या महिन्यात कारवाईचा बडगा उगारला होता. सध्या ग्रामीण उपविभागाचा कार्यभार असल्याने कारवाईसाठी अधिक वेळ देता येत नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत ग्रामीण उपअधीक्षक हजर होत आहेत. अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. थंडावलेल्या कारवाईला आठवडाभरात पुन्हा गती देण्यात येणार आहे. मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे यांनी दिली आहे.

अकार्यक्षम एलसीबी
वसुलीच्या कारणावरून एससीबीत प्रचंड असंतोष आहे. दोन कर्मचार्‍यांत हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. पोलिस निरीक्षकासमोर राडा झाला. संबंधित दोघांना काढून टाकल्याचे निरीक्षक सांगतात. मात्र, या दोघांचेही काम त्यांच्या परीने सुरू आहे. या शाखेकडे सोपवलेल्या एकाही प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही.