आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम सुरक्षा दल घालेल अवैध दारूविक्रीला आळा : व्ही. राधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - दारूबंदी केल्याने अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट होत असल्याचा अनुभव असल्याचे कारण पुढे करून उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी दारूबंदीच्या मुद्याला बगल देत अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राळेगणसिद्धीत सांगितले. राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यापेक्षा अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी सक्षम ग्राम सुरक्षा दलांची निर्मिती करून त्यांना कायदेशीर अधिकार देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यात दारूबंदी करण्याची मागणी केली होती. दारूबंदीसाठी ग्राम सुरक्षा दलांची स्थापना करून त्यांना कायदेशीर अधिकार देण्यात यावेत, असेही हजारे यांनी सूचवले होते. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कच्या राज्याच्या सचिव व्ही. राधा यांनी राळेगणसिद्धीत हजारेंची भेट घेतली.
राधा म्हणाल्या, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून सहा हजार अवैध व्यावसायिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क, गृह तसेच ग्रामविकास खात्याशी समन्वय साधून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ग्राम सुरक्षा दलाचा पर्याय उत्तम असून पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागातील तो दुवा ठरेल. हजारे यांनी ग्राम सुरक्षा दलाचा मसुदा दिला आहे. त्यात काही दुरुस्त्या, तसेच काही गोष्टींची वाढ करुन त्यास कायदेशीर स्वरूप देण्यात येईल. ग्राम सुरक्षा दलाचा निर्णय ऐतिहासिक असेल असा विश्वास राधा यांनी व्यक्त केला. दोन-तीन महिन्यांत या कायद्यास मूर्त स्वरूप येईल, असेही त्यांनी सांगितले.

वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर येथे संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. तथापि, चंद्रपूर येथे अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट आहे. त्यामुळे दारूचे परवाने बंद करून दारूबंदी होणार नाही, तर दारूबंदीसाठी समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत राधा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...