आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा: शहरातील बेकायदा इमारतींचा अहवाल शासनाने मागवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या विविध भागात काही बड्या धेंडांनी तब्बल ९३१ बेकायदा इमारती उभ्या केल्या आहेत. महापालिका प्रशासन केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार करून या अतिक्रमण धारकांना पाठिशी घालत आहे. परंतु आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या सर्व बेकायदा इमारतींचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शहराच्या विविध भागात ९३१ पक्की बेकायदा बांधकामे आहेत. रुग्णालये, अपार्टमेंट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच इतर इमारतींचा त्यात समावेश आहे. महापालिका प्रशासनाने या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापुढील कारवाई करण्यासाठी मात्र प्रशासनाला मागील अनेक वर्षांपासून मुहूर्त मिळालेला नाही. जागरूक नागरिक शाकिर शेख यांनी यासंदर्भात शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रारअर्ज दिला आहे. दैनिक दिव्य मराठीने देखील वेळोवेळी शहरातील बेकायदा इमारतींचा प्रश्न मांडला आहे. दैनिक दिव्य मराठीने २६ ऑगस्टला प्रसिध्द केलेली बेकायदा बांधकामांबाबतची बातमीच शेख यांनी नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना दाखवली. त्यांनी या वृत्ताची तत्काळ दखल घेत शहरातील बेकायदा बांधकामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शहराच्या विविध भागातील १२० रुग्णालयांना महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यापैकी ५२ रुग्णालयांचे बांधकाम पाडण्याचे अंतिम अादेश देण्यात आले, परंतु हे आदेश केवळ कागदावर राहिले. अद्याप एकाही बेकायदा रुग्णालयावर कारवाई झालेली नाही. नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते नागापूर पर्यंतच्या २०५ बेकायदा बांधकामांकडेदेखील प्रशासनाने साेयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. या महामार्गावर पश्चिम बाजूस १११, तर पूर्वेस ९४ बेकायदा बांधकामे आहेत. ठिकठिकाणी तब्बल ६०६ शॉपिंग कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट इतर बेकायदा इमारती आहेत. या इमारत मालकांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, परंतु अनेेक वर्षे उलटूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

माहिती असून कारवाई नाही
रुग्णालयांनी पार्किंगसाठी सोडलेल्या जागेवर बेकायदा मेडिकल लॅब सुरू केल्या आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर अनधिकृत व्यावसायिक गाळे दुकाने सुरू आहेत. महापालिका प्रशासनाला त्याबाबत सर्व माहिती असतानाही एकाही इमारत रुग्णालयावर अद्याप कारवाई झालेली नाही.

...तर न्यायालयात जाणार
दैनिक दिव्य मराठीने प्रसिध्द केलेल्या बेकायदा बांधकामांची बातमी तक्रारअर्जाला जोडली आहे. नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी हे वृत्त वाचून मनपा प्रशासनाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशाची प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही, तर मी न्यायालयात जाणार...'' शाकिर शेख, तक्रारदार.
बातम्या आणखी आहेत...