आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक व्यवसायातील वर्चस्वातूनच टोळीयुद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल, खोसपुरी शिवारात एकाच आठवड्यात दोन हॉटेलांवर युवकांच्या टोळक्याने हल्ला केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, या हल्ल्यामागील खरे कारण वेगळेच असल्याचे समोर येत आहे. महामार्गालगत काही ढाब्यांवर राजरोसपणे अवैधरित्या अनैतिक व्यवसाय सुरू असून त्यात मोठे अर्थकारण दडलेले आहे. त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. त्यात पोलिसांनी वेळीच लक्ष घातले नाही, तर पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

खाेसपुरी शिवारातील एका हॉटेलमध्ये १० सप्टेंबरला युवकाच्या टोळक्याने तोडफोड करून हॉटेलचे नुकसान केले. हल्लेखोरांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना गिऱ्हाईकांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात धारदार शस्त्रांचाही वापर झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवला. नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे एमआयडीसीचे सहायक पाेलिस निरीक्षक राहुल पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्यात घोडेगावच्या दुसऱ्याच दिवशी दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता.

दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणखी एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात आधीच्या गुन्ह्यात बरेच साम्य आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॉटेलांत एकाच टोळीने हल्ला केल्यामुळे पोलिसांना हल्लेखोरही निष्पन्न झाले. या दरोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले दोन हल्लेखोर सध्या पोलिस कोठडीत आहेत. फिर्यादीनुसार दोन्ही प्रकारांमध्ये दरोड्याची कलमे लावण्यात आली आहेत. मात्र, चौकशीतून दोन्ही हल्ल्यांमागील कारणे आता समोर येत आहेत. त्यानुसार हाॅटेलांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

असा चालताे व्यवसाय
महामार्गालगतढाब्यांवर परप्रांतीय मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. पोलिसांची नजर पडू नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली जाते. ढाब्यांवर येणारे गिऱ्हाईक वरकरणी जेवायला थांबले असावे, असा भास होतो. मात्र, ढाब्यांच्या मागच्या बाजूला काही अंतरावर शेतात वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना ठेवले जाते. ढाब्यांवर आलेले आंबटशौकिन गिऱ्हाईक खात्री पटल्यानंतरच तिथपर्यंत नेले जाते. त्यासाठी ढाबेवाल्यांची खास यंत्रणा कार्यरत आहे. चोरीछुपे चालणाऱ्या या व्यवसायात गिऱ्हाईकाला मोठा आर्थिक मोबदला मोजावा लागतो. म्हणूनच या धंद्यात मोठे अर्थकारण दडले आहे.

पुन्हा प्राणघातक हल्ला
पोलिसठाण्यात दरोड्याचे गुन्हे नोंदवले, तरीही अवैध व्यावसायिकांचे वाद मिटलेले नाहीत. गुरुवारी दुपारी हल्लेखोर टोळीतील एका युवकाला व्यावसायिकांनी उचलून वांजोळी परिसरात नेले. तेथे त्याच्यावर तलवारीसारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच काही युवक तेथे गेले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या युवकाला नगरच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. हा युवकाचे नावही दरोड्याच्या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर झालेला हल्ला वांजोळी गावाच्या परिसरात झाल्यामुळे सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

हवीय भागीदारी...
खोसपुरी,पांढरीपूल वांजोळी हद्दीलगत औरंगाबाद महामार्गाशेजारी बहुतांश ढाब्यांवर अनैतिक वैश्या व्यवसाय सुरू आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात भागीदारी मिळवण्यासाठी हॉटेलमालकावर हल्लेखोर टोळके दबाव टाकत होते. मात्र, व्यवसाय चालवणारेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी हा दबाव झुगारून लावला. त्यातून बऱ्याचदा किरकोळ वादही झाले. पण अलीकडच्या काळात हे वाद विकोपाला गेल्यामुळे टोळीयुद्धाचा भडका उडाला. शिवाय प्राणघातक हल्ले झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र, फिर्यादी नोंदवतानाही व्यावसायिकांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.

पुन्हा तेच व्यवसाय
चारवर्षांपूर्वी तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी खोसपुरी पांढरीपूल एमआयडीसी परिसरातील ढाब्यांवर छापे टाकले होते. परराज्यातील महिला युवतींकडून या ढाब्यांवर वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे छाप्यांतून समोर आले हाेते. काही ढाब्यांवर ज्योतिप्रिया सिंग यांनीच पुन्हा पुन्हा छापे टाकले. छापा टाकल्यानंतर काही दिवस हा व्यवसाय बंद असायचा. मात्र, या धंद्यात दडलेले अर्थकारण मोठे असल्यामुळे पुन्हा हा व्यवसाय सुरू होतो. गेल्या चार वर्षांमध्ये एकही छापा पडल्याची पोलिस दफ्तरात नोंद नाही. त्यामुळे या परिसरात हा व्यवसाय पुन्हा फोफावला आहे.

पोलिस अनभिज्ञ कसे काय?
महामार्गांलगतच्याढाब्यांवर वेश्याव्यवसाय सुरू असला, तरी गेल्या काही वर्षांत पोलिसांचे छापे पडलेले नाहीत. हा व्यवसाय राजरोस सुरू असूनही पोलिसांना त्याची खबर कशी काय मिळत नाही, हे गौडबंगालच आहे. अनैतिक व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत पिटा सेल कार्यरत आहे. पण या सेलचे पोलिस कर्मचारी नेमके करतात काय, असाही प्रश्न पडतो. अनैतिक व्यवसायांमुळे ढाब्यांवर गिऱ्हाईकांच्या मारामाऱ्या, वर्चस्वातून उडालेल्या चकमकी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही, तर या परिसरात मोठे टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.