आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदा बांधकामावर हातोडा; वाडिया पार्कवरील गाळे पाडण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाडिया पार्कवरील गाळे अनधिकृत असतील तर पाडून टाका! कारवाई करताना भेदभाव करू नका, अशा कडक शब्दांत नगरविकास व क्रीडा राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी महापालिकेचे अधिकारी व जिल्हा क्रीडाधिकार्‍यांना धारेवर धरले.
शिर्डी व शनिशिंगणापूर येथे देवदर्शन घेऊन जाधव मंगळवारी नगरला आले. शासकीय विर्शामगृह येथे त्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त महेश डोईफोडे व स्मिता झगडे, क्रीडाधिकारी अजय पवार, माजी महापौर संग्राम जगताप, अविनाश घुले, विनित पाऊलबुधे आदी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, अनधिकृत बांधकाम काढताना भेदभाव करू नका. असे केले तरच नगरविकासासाठी तुम्ही काहीतरी करता हे जनतेच्या लक्षात येईल. उबेद शेख व संजय झिंजे यांनी शहरातील नेहरू मार्केट, बेग पटांगणावरील अतिक्रमण हे प्रश्न निदर्शनास आणले, असता मंत्री जाधव यांनी आयुक्त कुलकर्णी यांना नेहरू मार्केट पाडण्यापूर्वी निविदा काढल्या होत्या का, असा सवाल केला. अधिकार्‍यांनी ही जागा ‘हार्ट ऑफ सिटी’त असल्याचे सांगत सारवासारव केली. त्यावर जाधव यांनी तुमच्याकडे नियोजन नव्हते, तर तुम्ही इमारत पाडली कशाला, अशा कडक शब्दांत अधिकार्‍यांना त्यांनी धारेवर धरले. अतिक्रमण निदर्शनास आल्यास संबंधित प्रभाग अधिकार्‍यांनी त्याची दखल घेऊन कारवाई करावी. तसे न केल्यास संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
मनपानेच एलबीटीचे दर ठरवावेत
नगरपालिकांपाठोपाठ महापालिकेतील जकातही टप्प्याटप्प्याने बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. एलबीटी दरांबाबत मनपाने निर्णय घ्यायचा आहे. कारण ही स्वायत्त संस्था आहे. एलबीटीमुळे कोणतेही नुकसान नाही. जेथे ही करप्रणाली सुरू झाली, त्या मनपांचे उत्पन्न वाढले आहे. औरंगाबाद महापालिकेचे उत्पन्न 200 कोटींनी वाढले, असे जाधव यांनी सांगितले.
क्रीडाधिकार्‍याची कानउघाडणी
वाडियापार्कबाबत मंत्री जाधव यांनी क्रीडाधिकारी पवार यांना चांगलेच धारेवर धरून तुमच्याकडून प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला जात नाही असे सुनावले. यावर पवार यांनी गाळ्यांबाबत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करताच जाधव यांनी तुम्हाला खरोखरच निर्णय करायचा आहे का ? असा सवाल करून पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या.
निवेदनांचा पाऊस
मंत्री जाधव विर्शामगृहावर आल्याचे समजताच मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी तिकडे धाव घेऊन शहरातील विविध समस्या, तसेच रखडलेल्या योजनांबाबतच्या निवेदनांचा पाऊसच त्यांच्यावर पाडला.