आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा फलकांची शहरात पुन्हा गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणूक व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा होर्डिंग्जची गर्दी झाली आहे. हे बेकायदा फलक हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. महापालिका प्रशासन मात्र या आदेशाची पायमल्ली करत फलक लावणार्‍यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी एका दिवसात अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी दिला होता. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने शहरात होर्डिंग हटाव मोहीम सुरू केली होती. सुरुवातीला तीन-चार दिवस विविध भागांतील बेकायदा फलक काढण्यात आले. अतिक्रमण विभागातील 10-15 कर्मचारी व चार प्रभाग कार्यालयांतील अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. मध्यवर्ती शहरासह सावेडी, झेंडीगेट, माळीवाडा, केडगाव अशा विविध ठिकाणचे फलक जप्त करण्यात आले.

परंतु ही मोहीम संपताच शहरात पुन्हा बेकायदा फलक लागले. त्यानंतर काही पुन्हा मोहीम राबवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे शहरात महिनाभर बेकायदा होर्डिंग्ज दिसले नाहीत. परंतु आता महापालिका निवडणूक व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा बेकायदा फलकांची गर्दी झाली आहे. दिल्लीगेट, कोर्ट परिसर, चितळे रोड, वाडिया पार्क, माळीवाडा, बसस्थानके, न्यू आटर््स कॉलेज, मंगलगेट, नेता सुभाष चौक आदी ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमुळे शहरातील सुमारे 25 ते 30 लहान-मोठ्या चौकांचे विद्रूपीकरण झाले आहे.

अधिकृतपणे फलक लावण्यासाठी शहरात 72 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. परंतु त्यासाठी परवानगी घेऊन पैसे मोजावे लागत असल्याने बहुतेक जण अनधिकृत फलक लावणे पसंत करतात. मनपाचे अधिकारी व कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शहरात बेकायदा फलकांचे प्रमाण वाढले आहे. खासगी ठेकेदारांमार्फत होर्डिंग लावले तर त्यातून मनपाला अपेक्षित उत्पन्न मिळेल. त्यामुळे होर्डिंग लावण्याच्या दरात वाढ करून खासगी ठेकेदाराला हे काम द्यावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली आहे.

प्रभाग अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
सावेडी, झेंडीगेट, बुरूडगाव व शहर या चार प्रभाग कार्यालयांकडे बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची जबाबदारी आहे. यापूर्वी ही जबाबदारी अतिक्रमण विभागाची होती. परंतु आता हे अधिकार प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडे सध्या निवडणुकीसह इतर कामांचा भार असल्याने त्यांनी बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे.

कारवाई होत नाही...
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात येतात. महापालिका अधिकार्‍यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच कारवाई झाली, तर बेकायदा होर्डिंग्ज लावणार्‍यांना जरब बसेल, परंतु तशी कारवाई होत नसल्याने होर्डिंग्जची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ’’ - सुरेश काकडे, व्यावसायिक, दिल्लीगेट

सावेडीत प्रभावी मोहीम
सावेडी उपनगरात होर्डिंग्ज हटाव मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली होती. त्यामुळे या भागात बेकायदा होर्डिंग्ज नाहीत. माझ्या जागी चार दिवसांपूर्वी प्रभाग अधिकारी म्हणून अंबादास सोनवणे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या माध्यमातून पुन्हा या भागात मोहीम राबवण्यात येईल.’’ - एस. बी. तडवी, निवडणूक विभागप्रमुख