आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलकांवर कारवाईसाठी पोलिसांचा पाठपुरावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात शहरात विनापरवाना फलकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना करणारे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठवले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिकेने अद्याप अशा फ्लेक्सवर व्यापक कारवाई करणारी यंत्रणा उभारलेली नाही. फ्लेक्सच्या वादातून दंगली घडल्याची उदाहरणेही राज्यात आहेत. शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणार्‍या फ्लेक्सचा राजकारणासाठी वापर वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत फलकांचे पेव फुटण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात परस्परांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न व स्वत:ची छबी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा फलकांचा अनेक जणांकडून वापर होऊ शकतो. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना देणारे पत्र पाठवले आहे. यापूर्वीही असे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा पत्रप्रपंच करण्यात आला. न्यायालयाचे आदेश व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विनापरवाना फ्लेक्स लावले जाणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना फ्लेक्सबाबत क्षेत्रनिहाय अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करावी. त्यांच्या कार्यक्षेत्रात आढळून येणार्‍या विनापरवाना फ्लेक्सबाबत या अधिकार्‍यांना जबाबदार धरावे. कारवाईबाबत लागणारी सर्व मदत पुरवण्यास पोलिस तयार आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभाग या पत्राला कसा प्रतिसाद देतात यावरच विनापरवाना फलकांवरील कारवाईचे भवितव्य अवलंबून आहे.

..अन्यथा कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्थांनी विनापरवाना फलक काढण्याची कारवाई करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव कालावधीत फलकांचा वापर अधिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन कारवाईबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी सहकार्य केल्यास विनापरवाना फलक लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करता येतील.’’ आर. डी. शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक.