आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आदेशाची पालिकेकडून पायमल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - संगमनेर नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यास पालिका असर्मथ ठरली आहे.

शहरात ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्स फलकांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शहरातील मुख्य चौकात या फ्लेक्स संस्कृतीला उधाण आले आहे. मध्यंतरी न्यायालयाने सर्व फ्लेक्स हटवण्याचे आदेश महापालिका व नगरपालिकांना दिले होते. या आदेशाची तेवढय़ापुरतीच अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर वाहतुकीला अडथळा ठरणारे हे फ्लेक्स पुन्हा दिमाखाने झळकू लागले आहेत. या फ्लेक्सच्या माध्यमातून अनेक स्वयंघोषित पुढारी जन्माला येत आहेत. त्यांचे दर्शन दररोज सकाळी संगमनेरकरांना होते.

रस्त्यावर लागलेल्या या फ्लेक्समुळे अपघात घडल्याची उदाहरणेही ताजी आहेत. मुख्य चौकात, शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानकाबाहेर, नवीन नगर रस्त्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नाशिक-पुणे महामार्ग या ठिकाणी रात्रीतून लागलेले फ्लेक्स पाहण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण मिळते.

वास्तविक पालिकेची परवानगी घेऊन आणि त्यासंबंधी पालिकेने निश्चित केलेल्या दराची आकारणी झाल्यानंतरच हे फ्लेक्स लावले पाहिजेत. मात्र, पालिकेकडून अशी कोणतीही परवानगी घेतली जात नाही. परवानगी न घेता लावलेले हे फ्लेक्स काढण्यास पालिका धजावत नाही. कारण लावला जात असलेला फ्लेक्स कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो. शहरात शेकडोने असे फलक लावण्यात आले आहेत. केवळ चार दोन हजारांत तयार होणार्‍या या फ्लेक्सने शहर मात्र विद्रूप होत असताना याचे कोणालाही काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.