आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मनपाच्या फलक हटाव मोहिमेस सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील फलक हटाव मोहीम महापालिका प्रशासनाने अखेर गुरुवारपासून हाती घेतली. अतिक्रमण विभाग व प्रभाग अधिकारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. पहिल्या दिवशी केडगाव परिसरातील अनधिकृत फलक हटवण्यात आले, अशी माहिती अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.

शहरातील अनधिकृत फलक काढून घ्यावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मनपाने फलकांकडे दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या आदेशानंतर तीन ते चार वेळा फलक हटाव मोहीम राबवण्यात आली, परंतु पुन्हा त्याच जागेवर फलक लावण्यात आले. यामुळे मनपाची ही मोहीम केवळ फार्स ठरली. मनपा निवडणूक व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. याबाबत केडगाव येथील नागरिक तात्यासाहेब कोतकर यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांना वकिलामार्फत नोटीस बजावली. ‘दिव्य मराठी’नेही वेळोवेळी अनधिकृत फलकांबाबत वृत्त प्रसिध्द केले. त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने फलक हटाव मोहीम हाती घेतली. गुरुवारी केडगाव देवी रस्ता, सक्कर चौक, कायनेटिक चौक, पुणे रोड, केडगाव वेस, शाहूनगर, अंबिकानगर, लिंक रोड, स्टेशन परिसर आदी ठिकाणचे फलक हटवले. ज्या ठिकाणचे फलक काढण्यात आले, त्या जागेवर पुन्हा फलक लावले, तर पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले. शुक्रवारी मध्यवर्ती शहरासह उपनगरातील फलक हटवण्यात येणार आहेत. संबंधितांनी कारवाईपूर्वीच फलक काढून घ्यावेत, असे आवाहनही इथापे यांनी केले आहे.